पुणे, १२ मे २०२५ : पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील नागरिकांनी राज्यशासनाच्या आदेशाची वाट न पाहता पुणे महापालिकेवर विश्वास दाखवत एप्रिल व मे महिन्यात मिळकतकर स्वरूपात तब्बल ३० कोटी ४४ लाख रुपये भरले आहेत. मिळकतकर कमी करण्यासाठी राज्यशासनाने सहा महिन्यांपूर्वी पालिकेला प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
महापालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी या गावांची मिळकतकर बिले फक्त ऑनलाईन स्वरूपात तयार केली असून शासनाकडून स्पष्ट आदेश न मिळाल्याने ती नागरिकांना पाठविण्यात आलेली नाहीत. तरीदेखील जवळपास २२ हजार मिळकतधारकांनी आपला कर वेळेत भरून महापालिकेवर विश्वास दर्शवला आहे. नव्याने समाविष्ट ३२ गावांमध्ये एकूण सुमारे साडेचार लाख मिळकती असून, या गावांची थकबाकी सुमारे ८५० कोटी रुपये आहे.
राज्यशासनाच्या आदेशानुसार समाविष्ट गावांतील कर वसूल करू नये तसेच सुधारीत दराने आकारणी करावी असे नमूद असले तरी, कोणत्या कायद्याच्या आधारे कर आकारणी करावी याबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांनी कर भरणे टाळले आहे. मात्र, महापालिकेच्या नियमांनुसार थकबाकीवर दर महिन्याला २ टक्के चक्रवाढ व्याज आकारले जाते. परिणामी वार्षिक २४ ते २७ टक्के व्याज भरावे लागण्याची शक्यता असून, याचा धसका घेत नागरिकांनी वेळेत कर भरणे पसंत केले आहे.
आकडेवारीनुसार:
२०१७ मध्ये महापालिकेत समाविष्ट झालेल्या ९ गावांमधून एप्रिल ते १२ मे २०२५ या कालावधीत १६ कोटी २९ लाख रुपयांचा मिळकतकर जमा झाला आहे. या कालावधीत ११,६०२ मिळकतींनी कर भरला.
तर २०२३ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांमधून याच कालावधीत १४ कोटी १५ लाख रुपयांचा कर जमा झाला असून, ८,७७७ मिळकतधारकांनी कर भरलेला आहे.
शासन निर्णयाची प्रतीक्षा असली तरी नागरिकांनी महापालिकेवर दाखवलेला विश्वास आणि करभरणीतील पुढाकार प्रशासनासाठी निश्चितच सकारात्मक संकेत आहे.

More Stories
मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांच्या कामांना मिळणार गती ; पुणे महापालिकेतर्फे १२२३ कोटींच्या निविदा मंजूर
Pune: “वंदे मातरम” गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त सामूहिक गान करण्याबाबत आयोजन, सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य
Pune: शिवसेना महिला आघाडीचे आक्रमक आंदोलन – रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी!