मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे दि.१२/०६/२०२१: मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली.


जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कौशल्य विकास व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र,पुणे यांचेमार्फत सूचिबध्द ४ शासकीय आस्थापना प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली १० जून रोजी घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य व वैदयकीय क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची तीव्र कमतरता जाणवत आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणा-या सुविधांचा वापर करुन त्याच ठिकाणी कुशल मनुष्यबळ तयार करावे, याकरिता राज्यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य व उदयोजकता विकास अभियानांतर्गत मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्हयामध्ये सन 2021 करिता एक हजार उमेदवारांना वन जॉब ट्रेनिंग देणे प्रस्तावित आहे.


 या कार्यक्रमांतर्गत प्रस्तावित प्रशिक्षण हे प्राधान्याने शासकीय संस्थांमार्फत राबविण्यात येणार असून याकरिता पुणे जिल्हयातील जिल्हा रुग्णालय औंध, शासकीय वैदयकीय महाविदयालय व जनरल हॉस्पीटल, बारामती, ससून जनरल हॉस्पीटल,यशवंतराव चव्हाण मेमोरिअल हॉस्पीटल या ४ शासकीय रुग्णालयाना, वैदयकीय शिक्षण संस्थांना व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे. या अनुषंगाने On Job Training सुरु होण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याकरिता सूचीबध्द शासकीय संस्थांची प्रशिक्षण क्षमता, प्रशिक्षणाची कार्यपध्दती, योजना राबविताना संभाव्य अडचणी आदी बाबत चर्चा करण्यात आली. On Job Training च्या माध्यमातून इस्पितळांना आवश्यक कुशल मनुष्यबळाचा पुरवठा सहजरित्या होणे शक्य असल्याने जिल्हयातील शासकीय इस्पितळांनी तसेच वैदयकीय शिक्षण संस्थांनी प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अधिकाधिक सहभाग घ्यावा. तसेच शासकीय रुग्णालयांनी कौशल्य विकास प्रशिक्षणाचा उत्तम दर्जा राखावा व प्रशिक्षणानंतर उमेदवारांना रोजगार प्राप्त होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी व योजना यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बैठकीदरम्यान दिले.

  या अनुषंगाने कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता विभागाच्या स्किल आणि एम्प्लॉयमेंट मिशन पुणे या फेसबुक पेजवर उपलब्ध  लिंकचा वापर करुन मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जिल्हयातील अधिकाधिक उमेदवारांनी आपला सहभाग नोंदवावा. तसेच याबाबत अधिक माहितीकरिता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता विभागाच्या 020-26133606 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा punerojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता विभागाच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.