कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत तीन वरिष्ठ निरीक्षकांना पोलिस आयुक्तांचा दणका, सुनावली शिक्षा

पुणे, १६/०६/२०२१: कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत तीन वरिष्ठ निरीक्षकांना पोलिस आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे. या तीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना एक वर्षे वेतनवाढ आणि सक्त ताकीदची शिक्षा पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सुनावली आहे. यामध्ये दोन निरीक्षकांना अवैधधंदाबाबत शिक्षा सुनावली आहे. तर, एका निरीक्षकाला तपास व्यवस्थित न केल्याबद्दल सक्त ताकीद देण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, अशोक कदम आणि अजित लकडे अशी शिक्षा सुनावलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

पाटील हे वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक असताना डिसेंबर २०२० मध्ये बेटींगबाबत छापा टाकण्यात आला होता. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी मनीष अजवानी याच्या मोबाईल क्रमांकाचा सीडीआर काढला. त्यावेळी पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील हे आरोपींवर छापा टाकण्यापूर्वी आरोपीसोबत बोललेल्याचे निष्पन्न झाले. तसेच, या पूर्वी देखील त्यांचे १३ वेळा फोनवर बोलणे झाल्याचे सीआडीआरमध्ये दिसून आले. त्यामुळे पाटील यांनी केलेले वर्तन बेजबाबदार पणाचे आहे. तसेच, कर्तव्यात सचोटी राखलेली नाही. पोलिस दलाच्या शिस्तीस बाधा आणणाने कृत्य केल्याचा ठपका ठेवत पाटील यांची एक वर्षे पगारवाढ रोखण्याची शिक्षा पोलिस आयुक्तांनी सुनावली आहे.

लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी २०२१ मध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार अड्डयावर छापा टाकून कारवाई केली. या ठिकाणी जुगार खेळताना ६२ जणांस पकडण्यात आले होते. त्यावेळी लष्कर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेश सोनवणे हे त्या ठिकाणी आले. पोलिस ठाण्याची संयुक्त कारवाई दाखव अथवा जास्त मोठी कारवाई करू नका, असे बोलू लागले. त्यामुळे या जुगार अड्ड्याची सोनवणे यांना माहिती होती, अशी वरिष्ठांना गोपणीय माहिती मिळाली होती. पण, त्यांनी जाणीवपूर्वक कारवाई केली नाही.लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजरोजपणे जुगार खेळला जात होता. हद्दीतील अवैधधंद्याचे उच्चाटन करण्याच्या सूचना दिल्या असताना देखील वरिष्ठ निरीक्षक अशोक कदम यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. कर्तव्यात कसुरी केल्याचा ठपका ठेवत त्यांना देखील पोलिस आयुक्तांनी एक वर्षे पगार वाढ रोखण्याची शिक्षा सुनावली आहे.

वरिष्ठ निरीक्षक अजित लकडे हे नगर जिल्ह्यातील शेगाव पोलिस ठाण्यात नेमणुकीला असताना त्यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल गुन्हयाचा तपास व दोषारोपपत्र दाखल करताना निष्काळजीपणा केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांना देखील पोलिस आयुक्तींनी चौकशी करून सक्त ताकीदची शिक्षा सुनावली आहे. पोलिस आयुक्तांनी थेट वरिष्ठ निरीक्षकांना शिक्षा सुनावल्यामुळे दलात खळबळ उडाली आहे. या द्वारे पोलिस आयुक्तांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना चांगले काम करण्याच्या अप्रत्यक्ष सूचनाच दिल्या आहेत.