पुणे रिंगरोड व रेल्वे भुसंपादन प्रक्रिया गतीने पुर्ण करा: जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे दि.24: कोणताही महत्त्वाचा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया जेवढया गतीने पुर्ण होईल, तेवढयाच गतीने प्रकल्प पुर्ण होतो. समृद्धी महामार्ग हे उत्तम उदाहरण असल्याचे सांगून पुणे शहर तसेच राज्यासाठीही महत्त्वपूर्ण रिंगरोड प्रकल्प सर्व मिळून पुर्ण करूया, असा विश्वास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केला. रिंगरोड तसेच पुणे- नाशिक रेल्वे मार्गासाठीची भूसंपादन प्रक्रिया गतीने पुर्ण करून दोन्ही प्रकल्प वेळेत पुर्ण करण्यासाठी आपण सर्व मिळून मिशन मोडवर काम करूया, यासाठी भूसंपादनाच्या मोजणी प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिल्या.


जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे रिंग रोड तसेच पुणे -नाशिक रेल्वे जमीन मोजणी व मुल्यांकन कार्यपदधती संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पुलकुंडवार तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख उपस्थित होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, उपवनसंरक्षक राहुल पाटील, उपायुक्त जयंत पिंपळगावकर, उपायुक्त नंदीनी आवडे उपस्थित होत्या.
यावेळी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, कोणताही महत्त्वाचा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी जेवढया गतीने भूसंपादन प्रक्रिया पुर्ण होईल, तेवढयाच गतीने प्रकल्प पुर्ण होतो, हा आपला समृद्धी महामार्गाचा चांगला अनुभव आहे. प्रकल्प पुर्ण करण्यासाठी यंत्रणेतील प्रत्येक घटकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे सांगून आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना काय सेवा देणार आहोत, याबाबत माहिती देणे गरजेचे आहे. पुणे जिल्हयातील महत्त्वपूर्ण रिंगरोड प्रकल्पासाठी ज्या परवानग्या आवश्यक आहेत, त्या सर्व परवानग्या घेवूनच आपण पुढे जाणार असून पुणेकरासांठी सर्व मिळून हा प्रकल्प पुर्ण करूया, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, रिंगरोड तसेच पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी मुल्यांकनासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. पुणे महानगरासोबतच राज्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. रिंगरोड तसेच रेल्वे प्रकल्पासाठी सर्व उपविभागीय अधिका-यांचा पुढाकार महत्वाचा आहे. गावस्तरावरील यंत्रणेकडून सातत्याने प्रकल्पाच्या कार्याचा आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. गावनिहाय बैठका घेत भूसंपादन प्रक्रियेला गती देत रिंगरोड प्रकल्प पुर्ण गतीने पुर्ण करूया, असा विश्वासही जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी व्यक्त केला.


उपायुक्त जयंत पिंपळगावकर यांनी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत माहिती दिली. अधिक्षक अभियंता आबासाहेब नागरगोजे यांनी प्रकल्पाची पार्श्वभूमी व तांत्रिकी माहिती दिली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक सुनील माळी उपजिल्हाधिकारी हनुमंत अरगुंडे यांनी भूसंपादन व मुल्यांकन प्रक्रियेबाबत सर्वस्तर मार्गदर्शन केले. भूसंपादन उपजिल्हाधिकारी प्रविण साळुंके यांनी प्रास्ताविक केले. उपअभियंता संदिप पाटील यांनी आभार मानले. यावेळी रिंगरोड तसेच पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत सबंधित अधिकारी उपस्थित होते.