लसीकरण योग्य वेळेत केल्यास वर्षाच्याअखेरपर्यंत स्थिती नियंत्रणात – सतीश मगर

पुणे, दि. 10 मे 2021: सर्व विकसक,व्यावसायिक व नागरिकांनी या कठीण काळात न खचता टिकून राहणे जास्त गरजेचे आहे. मगर म्हणाले कि, गोष्टी हळूहळू पूर्वपदावर येतील परंतु या कोरोनाच्या प्रादुर्भावापासूनच्या सुरक्षिततेसाठी लसीकरण हा एकच मार्ग आहे. जर योग्य वेळेत लसीकरण झाले तर या वर्षाच्या अखरेपर्यंत स्थिती पूर्वपदावर येऊ शकते. कोरोनाच्या काळात क्रेडाईचे सदस्य कायमच नियमांचे पालन करत आलेत आणि यापुढेही करत राहतील. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोरोनाच्या काळात विकसकांना मार्गदर्शन करण्यासाठी क्रेडाई महाराष्ट्राच्या वतीने  वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

क्रेडाईचे नैशनलचे चेअरमन सतीश मगर यांनी क्रेडाई महाराष्ट्रातील सर्व सदस्यांना संबोधीत केले.याचसोबत वेबिनारमध्ये देशातील 854 विकसकांनी हजेरी लावली. क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया आणि अनंत राजेगावकर , क्रेडाई नॅशनलच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र ठक्कर,  क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष सुनील फुरडे,सचिव सुनील कोतवाल यावेळी उपस्थित होते.

मातृ दिनाच्या निमित्ताने मगर यांनी क्रेडाई महाराष्ट्राचा भाग असलेल्या धुळे, रत्नागिरी, कराड, जळगाव, उस्मानाबाद आणि लातूर या सहा शहरांतील महिला विंगचे उद्धघाटन देखील यावेळी केले.  ५९ शहरांच्या शाखांमध्ये १९ शहरांमध्ये महिला केंद्रे आहेत.

व्यवसाय करताना त्याची रचना कोणत्या पद्धतीने असावी याचे विस्तृत वर्णन देखील मगर यांनी यावेळी केले. याशिवाय  उद्योजकांनी रतन टाटांसारख्या  उद्योजकांकडून काय काय आत्मसाद करण्यासारखे आहे ते सर्व उद्योजकांनी नक्की आत्मसाद केले पाहिजे असे नमूद केले.

चौकट :-  क्रेडाई नैशनलचे उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया म्हणाले कि, कोविडच्या दुसऱ्या लाटेत सापडलेल्या महाराष्ट्रात अनेक घर खरेदीदारांना मालमत्ता नोंदणीसाठी चार महिन्यांची मुदत वाढ मिळावी आणि  मुदतवाढीनंतर  त्यावर कोणत्याही प्रकारचा दंड आकारू नये.

चौकट :- क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील फुरडे म्हणाले कि, वाढते कोरोना रुग्णांचे प्रमाण पाहता माननीय उच्च न्यायालयाने संपूर्ण टाळेबंदी करण्याचे सुचविले आहे.  परंतु सध्या अनेक संकटांचा सामना करत, राज्य सरकारच्या सर्व नियमांची अंमलबजावणी करत धीम्या गतीने का होईना बांधकाम प्रकल्पांचे काम सुरू आहे. सुरक्षा नियमांचे पालन करण्यासह बांधकाम कामगारांना किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील बांधकाम विकसक व संस्थेतर्फे नियमित केला जात आहे.

लसींची पुरेशी उपलब्धता झाल्यास राज्य सरकारशी योग्य समन्वय साधून कामगारांच्या लसीकरणाची व्यापक मोहीम देखील क्रेडाई संस्था लवकरच हाती घेणार आहे.परंतु, दुर्दैवाने टाळेबंदीचा निर्णय झालाच तर त्याचा बांधकाम क्षेत्रावर थेट परिणाम होईल. म्हणूनच या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करत बांधकाम प्रकल्पांवर कोणतेही नवीन निर्बंध लादण्यात येऊ नये, अशीच आमची राज्य सरकारला विनंती आहे. टाळेबंदी टाळण्यासाठी राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्या करण्याची आमची भूमिका आहे.