कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन रुग्णालयांनी बालकांसाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा- सुविधा निर्माण कराव्यात: विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि. 10 मे 2021: कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सामना करताना वैद्यकीय तज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये संसर्ग आढळून येण्याची शक्यता गृहीत धरुन जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांनी लहान बालकांसाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा- सुविधा गतीने निर्माण कराव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केल्या.

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त संतोष पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ.अर्चना पाटील, आरोग्य विभागाचे सल्लागार तथा टास्क फोर्सचे डॉ. सुभाष साळुंके, डॉ.डी. बी.कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, ससून रुग्णालयाच्या कोरोना चाचणी विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयाचे अधिष्ठाता, अधीक्षक, प्रमुख डॉक्टर उपस्थित होते.

विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, पुणे विभागात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये बालके बाधित झाल्यास त्यांच्यावर योग्य उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी रुग्णालयांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना निर्माण करणे आवश्यक आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर, नर्सेस, पॅरा मेडिकल स्टाफ ने आपले कर्तव्य खूप चांगल्या पद्धतीने बजावले आहे. या पुढे देखील सर्व प्रकारच्या विशेषज्ञ डॉक्टरांनी कोरोना काळात सेवा द्यावी, असे आवाहन श्री. राव यांनी केले.

विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, कोविड आजाराबरोबरच कोविड पश्चात उद्भवणाऱ्या आजारामध्ये देखील उपचार सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गजन्य आजाराबाबतही दक्ष रहावे, असे आवाहन त्यांनी केले. कोरोना प्रतिबंधासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचा वापर आदी दक्षता मुलांनी घ्यावी, यासाठी पालकांनी बालकांमध्ये जागृती करावी, असे आवाहन यावेळी श्री. राव यांनी केले.

ससूनचे कोविड चाचणी विभागाचे डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी ससून मध्ये तयार करण्यात आलेल्या सुविधांबाबत माहिती दिली.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. संजय जोग म्हणाले, बऱ्याचदा कोरोनाच्या रुग्णांना सरसकट रेमडेसीविर चा वापर केला जात आहे. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार पद्धतीचे पालन होणे गरजेचे आहे.

भारती हॉस्पिटल चे डॉ.संजय ललवाणी म्हणाले, तिसऱ्या लाटेची शक्यता पाहून रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड तयार करणे आवश्यक आहे. याबरोबरच बालरोगतज्ञ, नर्स, औषधसाठा तयार ठेवणे गरजेचे आहे. याबरोबरच लहान बालकांसोबत येणाऱ्या मातांसाठी वेगळा कक्ष निर्माण करावा लागेल, असे सांगितले.
युनिसेफ चे प्रतिनिधी प्रवीण पवार यांनी तिसऱ्या लाटेमधील लोकांमधील कोविडचा धोका कमी करण्यासाठी सहभाग्य पध्दतीने जाणीवजागृती कार्यक्रम करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
बैठकीत संचालक डॉ.अर्चना पाटील, टास्क फोर्स चे डॉ. सुभाष साळुंके, डॉ. डी. बी.कदम यांनी कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेतील लक्षणे, संभाव्य तिसरी लाट, उपाययोजना, म्युकर मायकोसिस मधील उपचार, आदी बाबतीत माहिती दिली. तसेच ग्रामीण भागातील नागरिक व बालकांना त्याच भागात वैद्यकीय सेवा मिळवून दिल्यास शहरातील रुग्णालयावर ताण येणार नाही असे सांगितले.
बैठकीला जिल्ह्यातील विविध रुग्णालयांचे प्रमुख डॉक्टर उपस्थित होते.