पुण्यातील शाळांमध्ये सुरू होणार लसीकरण

पुणे, १८/०१/२०२२: सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी येथील स्व. तु. ग. गोसावी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १५ ते १८ वयोगटातील मुलामुलींसाठी करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. वडगाव बुद्रुक, हिंगणे खुर्द (प्रभाग क्रमांक ३४) च्या नगरसेविका मंजुषा नागपुरे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबविला जात आहे.

 

संपूर्ण देशात १५ ते १८ वयोगटातील मुलामुलींसाठी करोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पुणे शहरातील ठराविक केंद्रांवर या वयोगटातील मुलांना लस दिली जात आहे. लस घेण्यासाठी होत असलेली गर्दी लक्षात घेत प्रभातील शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी शाळेतच ही लस उपलब्ध करून देण्याची मागणी महानगपालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. याची दखल घेत पालोलिकेच्या आरोग्य खात्याने विठ्ठलवाडी येथील गोसावी माध्यमिक विद्यालयात लसीकरण मोहिम राबविण्यास सुरुवात केली, अशी माहिती नगरसेविका नागपुरे यांनी दिली. शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत जाऊन लसीकरण करण्याचा हा शहरातील पहिलाच उपक्रम असल्याचे नागपुरे यांनी सांगितले.

 

विद्यार्थ्यांसाठी शाळेत लसीकरण मोहीम आयोजित करण्याबाबत गोसावी शैक्षणिक संस्थेबरोबर चर्चा केल्यानंतर मुख्याध्यापक किरण सुर्यवंशी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पालिकेकडे मागणी केली. विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पखाले, लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी लस उपलब्ध करून देत उपस्थित राहून या मोहिमेची सुरुवात केली. निरामय संस्थेची टीम या लसीकरणासाठी उपस्थित असून डॉ. जयश्री शेटे, सिस्टर सुप्रिया मांडवकर आणि स्नेहल नायर हे यावेळी उपस्थित होते.

 

“गोसावी विद्यालयातील लसीकरण मोहिमेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रभागातील सर्व शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने अशा पद्धतीने लसीकरण मोहीम राबविण्याचा प्रयत्न आहे.” – मंजुषा नागपुरे, स्थानिक नगरसेविका