पुणे: कंडोम आणून देण्यास नकार देणाऱ्या अल्पवयीनावर सराईताने केला वार  

पुणे, ०५/०८/२०२१: मेडीकलमधून कंडोम आणून देण्यास नकार दिला म्हणून सराईताने एका अल्पवयीन मुलाच्या गळ्यावर चाकूने वार करून खूनाचा प्रयत्न केला आहे.  ही धक्कादायक घटना  मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास थिटे वस्ती खराडी परिसरात  घडली. याप्रकरणी निलेश वाघमारे (वय.२१,रा. थिटेवस्ती खराडी) याच्यावर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुकाराम नगर येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने चंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगा   त्याच्या मित्राला भेटण्यासाठी थिटेवस्ती परिसरात गेला होता. त्यावेळी सराईत निलेश याने अल्पवयीन मुलाला पैसे देऊन मेडीकलमधून कंडोम घेऊन येण्यास सांगितले. मात्र मुलाने त्याला नकार दिला. त्यामुळे निलेशने चिडून मुलाला शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यास सुरूवात केली. माझे काम तु ऐकत नाही काय थांब आता तुला जिवंत सोडत नाही असे म्हणत तेथील वडापावच्या हॉटेलमधील चाकू घेऊन येऊन अल्पवयीन मुलाच्या गळ्यावर वार करून जखमी केले.

 त्यानंतर अल्पवयीन मुलाने हा प्रकार घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी सराईत आरोपीचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती  वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल जाधव यांनी दिली.