राज्यातील अनोंदणीकृत हॉटेल्सना औद्योगिक दर्जा मिळण्यासाठीचे निकष जाहीर : अर्जाची प्रक्रिया महाराष्ट्र पर्यटनाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरु

मुंबई, ०७ मे २०२१: दि. ०१/०४/२०२१ च्या केंद्रशासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील केंद्रात नोंदणीकृत असलेल्या १ ते ५ तारांकित हॉटेल्सना औद्योगिक दर्जा देण्यात आला आणि त्यांची वीजबिले, पाणीपट्टी, मालमत्ता कर इत्यादींची आकारणी औद्योगिक दराने करण्यास सुरवात झाली. कित्येक  वर्षे  विचाराधीन असलेल्या  या  निर्णयाची  आता  अंमलबजावणी होत  आहे  जेणेकरून  राज्यातील केंद्रात नोंदणीकृत असलेली  हॉटेल्स औद्योगिक दराने मिळणाऱ्या सवलतींना पात्र आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या पुढाकारातून राज्यातील अनोंदणीकृत हॉटेल्स नोंदणीकृत करण्याचा व त्याचबरोबर औद्योगिक दर्जा देण्याचा महाराष्ट्र शासनाचा विचार होता. त्याप्रमाणे ३ डिसेंबर २०२० च्या शासननिर्णयानुसार  श्री. धनंजय  सावळकर , संचालक, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली  तज्ञांची समिती नेमण्यात आली व  महाराष्ट्र  राज्यातील हॉटेल्सचे औद्योगिक दर्जा  मिळवण्यासाठीचे निकष ठरवण्यात आले.  या  समितीचे काम पूर्ण झाले असून महाराष्ट्रातील अनोंदणीकृत हॉटेल्सना  औद्योगिक दर्जा मिळवण्यासाठी अर्ज करता  येणार आहे.

महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाविषयी  असे निरीक्षण नोंदवण्यात आले की पर्यटन व्यवसाय हा कोरोना वैश्र्विक महामारीच्या  नंतर आशेचा नवा किरण  घेऊन येऊ  शकतो.  महामारीनंतर आर्थिक दृष्ट्या  पूर्वपदावर  येण्यासाठी पर्यटन  क्षेत्र मोठा हातभार लावू शकते कारण प्रतिवर्ष  ८.५% दराने  वृद्धी आणि राज्याच्या सकल उत्पन्नात ५५ बिलियन डॉलर्स इतकी  भर घालण्याची क्षमता पर्यटन क्षेत्रात आहे. मात्र  सध्या या  क्षेत्राला कोरोना वैश्विक महामारीमुळे अंदाजे २.८ लक्ष रोजगार गमवावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटन  क्षेत्राला बळकटी देणे अगत्याचे ठरते. हॉटेल्सना  सध्या रोजगार मिळवण्याची  संधी कमी प्रमाणात उपलब्ध असताना  व्यावसायिक दराने वीज  शुल्क, पाणीपट्टी, मालमत्ता कर इत्यादी भरावे लागत  आहे. हे विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने खास आदरातिथ्य क्षेत्रातील अनोंदणीकृत हॉटेल्स साठी औद्योगिक  दर्जा मिळवण्यासाठीचे निकष जाहीर केले असून, औद्योगिक दर्जा मिळवण्यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया महाराष्ट्र पर्यटन च्या अधिकृत  संकेतस्थळावर खुली  केली आहे.

या नवीन दर्जामुळे हॉटेल व्यावसायिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाच्या समितीने ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता केल्यानंतर या औद्योगिक  दर्जाच्या सवलतींचा लाभ घेणे हॉटेल व्यावसायिकांना शक्य होणार आहे. परिशिष्ट- अ  आणि परिशिष्ट- ब अशा दोन भागांत हे निकष देण्यात आले आहेत. परिशिष्ट – अ मध्ये अनोंदणीकृत हॉटेल्सना  ‘किमान मूलभूत दर्जा’साठी ५० अनिवार्य  निकष देण्यात आले आहेत. यात मुख्यतः किमान ६ हवेशीर खोल्या असणे, खोल्यांचा आकार, स्वच्छता, स्वागत कक्ष व अन्य सार्वजनिक आवाराचे व्यवस्थापन, स्वच्छ आणि परवानाप्राप्त स्वयंपाकघर, दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था, हॉटेल कर्मचाऱ्यांचे वर्तन नियम पाळणे तसेच सुरक्षित आणि आदरणीय पर्यटनाची अंमलबजावणी करणे  इत्यादींचा अंतर्भाव आहे.

परिशिष्ट ब मधील निकष ‘ग्रीन हॉटेल दर्जा’साठी असून यात एकूण ४३ निकष दिले आहेत. ग्रीन हॉटेल दर्जा पर्यावरणस्नेही आणि शाश्वत पर्यटन वर्तनाला प्रोत्साहन मिळावे या दृष्टीने देण्यात येणार आहे. या ४३ पैकी १० मूलभूत निकषांची अंमलबजावणी केल्यास ग्रीन हॉटेलचा दर्जा मिळू शकतो. यात पर्यावरणस्नेही वर्तनासाठी कर्मचाऱ्यांना वार्षिक प्रशिक्षण, सांडपाणी निःस्सारण, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी, पर्यावरणस्नेही उपकरणांचा जास्तीत जास्त वापर, ग्राहकांचे पर्यावरणस्नेही वर्तन, पाणी आणि ऊर्जेची बचत करणाऱ्या उपकरणांचा वापर इत्यादी मुख्य निकष असणार आहेत.

अर्ज करण्याची प्रक्रिया:

‘महाराष्ट्र पर्यटन’ च्या अधिकृत संकेतस्थळावर व्हॉट्स न्यू टॅब वर जाऊन https://docs.google.com/forms/d/102pqZqSVF_LkQWFYTCcIlIqGopWyf-MHiGjGRrJfFFw/viewform?edit_requested=true&pli=1 सर्व कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज सादर करावा.

अर्जदार हॉटेलच्या नोंदणी प्रमाणपत्राच्या दिनांकापासून औद्योगिक दर्जा व त्यानुसार सवलती लागू होतील. इच्छुक हॉटेल व्यवसायिकांनी हा शासन निर्णय शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions   जाऊन पाहावा व ‘महाराष्ट्र पर्यटन’च्या अधिकृत संकेतस्थळावर https://docs.google.com/forms/d/102pqZqSVF_LkQWFYTCcIlIqGopWyf-MHiGjGRrJfFFw/viewform?edit_requested=true&pli=1  मोठ्या संख्येने नोंदणी करावी असे आवाहन पर्यटन संचालनालय, आणि पर्यटन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.