लसीकरणाबाबतचा गोंधळ संपविण्यासाठी डॅशबोर्ड मार्फत अद्ययावत माहिती द्यावी: आमदार शिरोळे

पुणे, दि. 04 मे 2021: कोविड प्रतिबंधासाठी लसीकरण हेच प्रभावी शस्त्र आहे, हे लक्षात घेऊन लसीकरणाबाबत राज्य सरकारने पारदर्शी राहून लसीकरणाची दैनंदिन माहिती डॅशबोर्डवर तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंगळवारी केली आहे.

पुणे शहरात कोविड साथीचे थैमान चालू आहे. महाराष्ट्रातही कोविडचे रुग्ण वाढत आहेत. अनेकांना काळजीने ग्रासले आहे. प्रतिबंधात्मक लस टोचून घेण्याची लोकांची तयारी आहे. परंतु अशावेळी सलग चार दिवस लसीकरण बंद रहात आहे. १८ वर्षे वयावरील व्यक्तींना लस मिळत नाही, ४५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत आणि एवढे सगळे गोंधळाचे वातावरण असताना त्याबाबत राज्य सरकारकडून काहीही संवाद साधला जात नाही. माझी मुख्य मंत्र्यांना विनंती आहे की लस उपलब्ध नसेल, लस विकत घेता येत नसेल, लस मिळत नसेल अशी काही कारणे असतील तर त्याबाबतची माहिती राज्य सरकारकडून का दिली जात नाही याबाबत माझ्या मनात संभ्रम आहे असे आमदार शिरोळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

राज्य सरकारने डॅशबोर्ड तयार केला पाहिजे त्यामध्ये आत्तापर्यंत किती लोकांना लस दिली गेली? किती प्रमाणात लस मिळाली? आणि मिळालेली लस महाराष्ट्रातील कुठल्याकुठल्या शहरात किती प्रमाणात वाटली गेली? याबाबतची माहिती दिली गेली पाहिजे. राज्य सरकार ती माहिती देत नाही आणि त्याचे कारणही कळत नाही. कुठल्या कंपनीशी राज्य सरकार वाटाघाटी करत आहे? कधीपासून लस उपलब्ध होणार आहे? याचीही माहिती दिली जात नाहीये. ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी दिलेली अपॉइंटमेंट रद्द होत आहे. असा सगळा गोंधळ होत आहे. हे टाळण्यासाठी लसीची उपलब्धता, लसीकरणाची प्रत्यक्ष स्थिती याबाबत डॅशबोर्ड मार्फत लोकांना माहिती दिली जावी अशी माझी मुख्य मंत्र्यांना कळकळीची विनंती आहे. राज्य सरकार जेवढा पारदर्शीपणा ठेवेल तेवढा सरकारवरचा लोकांचा विश्वास वाढेल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकात म्हटले आहे.