अमेनिटी स्पेस भाड्याने देण्याचा निर्णय घातक: खासदार वंदना चव्हाण

पुणे, १९/०८/२०२१: पुण्यातील १८३ अमेनिटी स्पेस भाडे तत्वावर देण्याचा घाट महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या भाजप पक्षाने मांडला आहे.

शहराच्या दृष्टीने अतिशय घातक अश्या या निर्णयाला पुणेकरांनी कडाडून विरोध करण्याची गरज आहे, अशी भूमिका राज्यसभा खासदार अँड. वंदना चव्हाण यांनी मांडली आहे.

शहर विकास आराखड्यातील आरक्षणे तसेच अमेनिटी स्पेस ह्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असतात मात्र अमेनिटी स्पेसला विशिष्ट कारणासाठी आरक्षण नसल्यामुळे कोणीही कुठल्याही कारणासाठी त्याचा वापर करू शकते. ह्यासाठी अमेनिटी स्पेसचा ‘मास्टर प्लॅन’ करण्याची गरज आहे.

ह्यापूर्वी देखील सदर अमेनिटी स्पेसचा ‘मास्टर प्लॅन’ करावा असे महानगरपालिका आयुक्तांना सूचित केले होते. या सूचनांची पर्वा न करता भाडे तत्वावरच्या ह्या प्रस्तावाला स्थायी समिती समोर मान्यतेसाठी आणले आहे.

पुणे शहराचे प्रदूषण झपाट्याने वाढत आहे आणि ते वाढत राहणार आहे. विकासाच्या नावाखाली झाडे कापली जातात परंतु त्याप्रमाणात झाडे लावली जात नाहीत – ७४ व्या घटना दुरुस्तीने महानगरपालिकांनी ‘अर्बन फॉरेस्ट’ (शहरी वने) विकसित करावी असे बंधन घातले आहे – ग्लोबल वार्मिंगचे संकट आज आपल्याला भेडसावत आहे अश्या वेळी मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करणे ह्याला महत्व प्राप्त झाले आहे. बांधकाम झाले कि त्याठिकाणी पाणी जमिनीत मुरण्याची प्रक्रिया पूर्ण बंद होते – त्याचे परिणाम आपण पावसानंतर झालेल्या पूरपरिस्थितीत अनुभवली आहे अश्या परिस्थितीत मोकळ्या जागांवर पुन्हा काँक्रीट जंगलचा हा घाट सर्व पुणेकरांनी हाणून पाडला पाहिजे. तसेच सर्वांनी एकत्रित येऊन सदर प्रस्तावाला विरोध करणे हि आजची तातडीची गरज आहे, असे वंदना चव्हाण यांनी सांगितले.