गृह विलगिकरण बंद करण्याचा निर्णय अव्यवहार्य : महापौर मोहोळ

पुणे, दि.२५ मे २०२१: पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत असताना. राज्यातील १८ जिल्ह्यामध्ये होम आयसोलेशन बंदचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. हा निर्णय व्यवहार्य नसून त्याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली.

होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेची भूमिका जाहीर केली.

याबाबत भूमिका जाहीर करताना महापौर मोहोळ पुढे म्हणाले की, ‘पुणे शहरात रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. महापालिका प्रशासन चांगल्या प्रकारे काम करीत असून सर्व पूर्वपदावर येत असल्याचे वाटत असताना. मात्र आज राज्य सरकारने 18 जिल्ह्यामध्ये होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश आला आहे. हा निर्णय व्यवहार्य नसून राज्य सरकारने पुनर्विचार करण्याची गरज आहे. अशा प्रकारचा निर्णय घेण्याची, आता तरी वेळ नव्हती. अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

ते पुढे म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात एकाच भागातील किंवा दाट लोक वस्तीमध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत होते. त्यामुळे उपचार करण्यावर अडचणी येत होत्या. हे लक्षात घेऊन महापालिका प्रशासनमार्फत कोविड केअर सेंटर अनेक भागात उभारले. त्यामध्ये उपचार घेऊन अनेक नागरिक बरे होऊन घरी देखील गेले आहे. मात्र तेव्हाची आणि सध्याची परिस्थिती वेगळी आहे. आताच्या घडीला सोसायटीच्या परिसरात जास्त रुग्ण आढळून आले. मात्र या लाटेतील बहुतांश रुग्णांकडे गृहविलगीकरणाची सोय उपलब्ध होती आणि यामुळे असे रुग्ण घरच्या घरी बरे झाले, ही वस्तुस्थिती आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोविड केअर सेंटर, क्वारंटाईन सेंटरची निर्मिती नव्याने करावी लागणार आहे. त्यासाठी वेगळे मनुष्यबळ आणि पैसे खर्च होणार आहेत. त्यातच कोविड केअर सेंटर कोण उभारणार? याचीही स्पष्टता नाही. शिवाय जर या नियमांची अंमलबजावणी केलीच तर याला प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण पहिल्या लाटेत असणारी नागरिकांची मानसिकता आणि या लाटेत असणारी मानसिकता यात फरक आहे. दुसऱ्या लाटेत जवळपास ८० टक्के रुग्णांची गृहवीलगिकरणाचा पर्याय अवलंबला होता, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे.