संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोविड -19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालय आणि सशस्त्र दलांच्या सज्जतेचा आढावा घेतला

नवी दिल्‍ली, 20 एप्रिल 2021: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशभरातील कोविड -19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत संरक्षण मंत्रालय आणि सशस्त्र दलांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली.

राजनाथ सिंह यांना एएफएमएस, डीआरडीओ, संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (डीपीएसयू), आयुध फॅक्टरी बोर्ड (ओएफबी) आणि  नॅशनल  कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) या संरक्षण मंत्रालयाच्या इतर संस्थांनी या संकट काळात नागरी प्रशासनाला मदत पुरविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांविषयी माहिती दिली.  नागरी प्रशासन / राज्य सरकार यांना लवकरात लवकर ऑक्सिजन सिलिंडर आणि अतिरिक्त बेड उपलब्ध करुन देण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे आवाहन त्यांनी डीपीएसयू, ओएफबी आणि डीआरडीओला  केले.

त्यांनी सशस्त्र दलांना  राज्य सरकारांशी जवळून  संपर्क साधण्याचे व आवश्यक त्या मदतीसाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले. संरक्षण मंत्र्यांनी  खरेदीसाठी आपत्कालीन अधिकार देखील बहाल केले.

डीआरडीओ अध्यक्षांनी संरक्षण मंत्र्यांना सांगितले की डीआरडीओने विकसित केलेली कोविड -19 सुविधा  नवी दिल्लीत पुन्हा कार्यान्वित करण्यात आली  आहे आणि लवकरच बेडची संख्या 250 वरून 500 पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

संरक्षण मंत्र्यांनी सद्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागरी प्रशासन / राज्य सरकारांना मदत करण्यासाठी सशस्त्र दलाच्या लसीकरण झालेल्या सेवानिवृत्त  जवानांच्या सेवांचा उपयोग करून घेण्याची सूचना केली.

बैठकीत  राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दल कर्मचारी आणि संरक्षण मंत्रालयात कार्यरत अधिकारी/ कर्मचाऱ्यांमध्ये कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठीच्या उपायांवर देखील चर्चा केली.