कोविड रुग्णांसाठी सार्वजनिक रुग्णालयामध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध करण्याची मागणी

पुणे,25 जानेवारी 2022 : कोविड-19 महामारीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत असताना, मागील अनुभव लक्षात घेता त्यावेळी झालेल्या चूका पुन्हा होऊ नयेत, यासाठी शासकीय यंत्रणा अधिक सतर्क होणे आवश्‍यक आहे. प्रशासनाने कोविड रुग्णांसाठी सार्वजनिक रुग्णालयामध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध कराव्यात, तसेच खासगी रूग्णालयांमध्ये दर निश्‍चिती करावी, अशी मागणी जन आरोग्य अभियानतर्फे करण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संघटनेतर्फे यासंदर्भातील निवेदन राज्य शासनाकडे देण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे गिरीष भावे यांनी दिली. या अभियानाच्या राज्य समितीमध्ये डॉ. अनंत फडके, डॉ. अभय शुक्‍ला, डॉ. सतीश गोगुलवार, डॉ. अभिजीत मोरे, डॉ. सुहास कोल्हेकर, शुभांगी कुलकर्णी, मीना शेषू, डॉ. मधुकर गुंबळे, ब्रीनेल डिसोझा, कामायनी महाबल, पूर्णिमा चिकरमाने, शहाजी गडहिरे, कॉ. शंकर पुजारी, डॉ. शशिकांत अहंकारी, रंजना कान्हेरे, काजल जैन, अविनाश कदम,डॉ. हेमालता पिसाळ, ऍड. बंड्या साने, डॉ. स्वाती राणे, लतिका राजपूत, राजीव थोरात, सचिन देशपांडे, डॉ किशोर मोघे, नितीन पवार, सोमेश्वर चांदूरकर, अविल बोरकर, तृप्ती मालती यांचा सहभाग आहे.
अभियानातर्फे राज्य शासनाला देण्यात आलेल्या निवेदनात सार्वजनिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयामध्ये बेड, औषधे आणि इतर सुविधा वाढवल्या जाव्यात, सर्व रुग्णांची तपासणी करताना त्यांचे तापमान, रुग्णाची ऑक्‍सीजन तपासणीसाठी सक्षम आणि पुरेशी यंत्रणा उभी केली जावी, कोविड रूग्णांवरील उपचाराच्या काळात प्रसूती, बाल आरोग्य, डायलेसिस, शस्त्रक्रिया यांसारख्या इतर रूग्नांची होणारी हेळसांड या पुढील काळात होवू नये याची दक्षता घ्यावी, खाजगी रूग्नालयांकडून राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अतिरिक्त बिल घेतले जाऊ नये, हे सुनिश्‍चित करण्यासाठी सरकारने दिलेल्या दर नियंत्रणाची माहिती सर्वत्र प्रसारित करावी, रुग्णांना उपचार घेताना अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी सरकारने महापालिका, नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद पातळीवर तक्रार निवारण यंत्रणा उभी करावीअ अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.