September 12, 2025

हापूस आणि केसर आंब्यांची पुणे बाजारपेठेत मागणी

विक्रांत सोनवणे
मार्केट यार्ड, १५ मे २०२५ : पुणे शहरात उन्हाळ्याची चाहूल लागताच आंब्यांचा सण बहरात आला आहे. मार्केट यार्ड परिसरात सध्या हापूस आणि केसर आंब्यांची जोरदार आवक असून, ग्राहकांमध्ये खरेदीसाठी उत्साहाचं वातावरण आहे.

देवगड हापूसला विशेष पसंती :
यंदाच्या हंगामात विशेषतः रत्नागिरी आणि देवगड येथून आलेल्या हापूस आंब्यांना ग्राहकांची सर्वाधिक मागणी आहे. देवगड हापूसचे घाऊक दर सध्या ₹१,६०० ते ₹२,४०० दरम्यान असून, किरकोळ विक्री ₹४०० ते ₹६०० प्रति डझन दराने होत आहे.

“या वर्षी ग्राहक देवगड हापूस आंब्यालाच अधिक प्राधान्य देत आहेत. रत्नागिरी हापूसचा पुरवठा मर्यादित असल्याने त्याचे दर आणखी वाढू शकतात.” असे मार्केट यार्डमधील व्यापारी खांडू शिर्के यांनी सांगितले.

केसर आंब्याची आवक २० मेनंतर –
गुजरातहून येणाऱ्या केसर आंब्यालाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्याच्या गोडसर चव आणि आकर्षक रंगामुळे तोही लोकप्रिय ठरत आहे. सध्या केसरचा घाऊक दर ₹१,६०० ते ₹१,८०० दरम्यान असून, किरकोळ दर ₹८० ते ₹१०० प्रति किलो इतका आहे. दरम्यान २० मेनंतर केसरची मोठ्या प्रमाणावर आवक होईल, त्यामुळे बाजारात आणखी गती येईल. असे ही शिर्के यांनी नमूद केले.

इतर आंब्यांची मागणी कमी –
बदाम, लालबाग, तोतापुरी, लंगडा आणि इतर आंब्यांचे प्रकारही बाजारात उपलब्ध असले तरी ग्राहकांची निवड प्रामुख्याने हापूस आणि केसरकडे झुकलेली आहे. बदाम आंबा ₹१,४०० ते ₹१,६०० दरम्यान विकला जात आहे, मात्र मागणी तुलनेने कमी आहे.

पावसाच्या अनिश्चिततेतही हंगाम तेजीत
अवकाळी पावसामुळे उत्पादनात काहीशी घट झाली असली, तरी पुण्यातील आंबा बाजार सध्या तेजीत आहे. सध्या सर्वात झाली असून खरी खरेदी आणि गर्दी पुढील आठवड्यात दिसेल, असे शिर्के यांनी स्पष्ट केले.