पुणे विद्यापीठाच्या परिक्षा वेळापत्रकात बदल करण्याची मागणी, युवक क्रांती दलाने घेतली प्र – कुलगुरूंची भेट 

पुणे, १९ डिसेंबर २०२२: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर आले आहे. आताच्या वेळापत्रकात इंजिनिअरिंग, लॉ, फार्मसीचे पेपर सलग पध्दतीने घेण्यात येत असून दोन पेपरमध्ये गॅप नाही. हा बदल इतर वर्षाचे अभ्यासक्रम पूर्ण न झाल्यामुळे करण्यात आला आहे अशी माहिती समोर येत आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे वेळापत्रकात बदल करण्याची मागणी युवक क्रांती दलाने प्रकल्प संजीव सोनवणे यांच्याकडे केली आहे.

 

पुणे शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हे सासवड, खेड, नारायणगाव, दौंड अशा भागातून रोज प्रवास करून येतात. त्यांचा बराचसा वेळ प्रवासात जातो. आताच्या वेळापत्रकानुसार पेपरमध्ये सुट्टी नसल्याने विदयार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास वेळ मिळणार नाही. याचा थेट परिणाम विदयार्थ्यांच्या गुणवत्तेवर होणार आहे. याचा विचार करून विद्यापीठाने वेळापत्रकात योग्य तो बदल करावा. या मागणीसाठी विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या अडचणी मांडून निवेदन देण्यात आले. यावर प्रा.सोनवणे यांनी परीक्षा संचालकांची मीटिंग घेऊन आवश्यक तो बदल केला जाईल असे आश्वासन दिले.

 

विदयार्थ्यांना आंदोलनास भाग पाडू नये यावर तातडीने निर्णय घ्यावा असा इशारा युक्रांद कडून देण्यात आला. यावेळी युवक क्रांती दल पुणे शहर अध्यक्ष सचिन पांडुळे, रौनक खाबे, विद्यार्थी प्रतिनिधी महेश घाडगे, कृष्णा नलावडे, शंतनू भुते उपस्थित होते.