खासगी लसीकरणाचे दर निश्चित करा : महापौर मोहोळ

पुणे, दि.२५ मे २०२१: पुणे शहरातील काही खासगी रूग्णालयांमार्फत सध्या कोरोना लसीकरण सुरु असून या ठिकाणी वेगवेगळे दर आकारले जात आहेत. शिवाय हे दर बाराशे रुपयांपर्यंत आकारले जात आहेत. याबाबतच्या तक्रारी मोठ्या प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयाकडून होणाऱ्या लसीकरणासाठी समान दर आकारले जावे, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुणे शहरात कोरोना आजाराचा पहिला रुग्ण आढळल्यापासून आज अखेर शासनाकडून येणार्‍या प्रत्येक नियमांचे पालन करून रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यात यश आले आहे. आजच्या स्थितीला शहरात पहिला आणि दुसरा डोस मिळून १० लाख नागरिकांचे लसीकरण केले आहे. मात्र महिनाभरात अनेक वेळा शासनाकडून पुणे शहराला लस उपलब्ध न झाल्याने, अनेक वेळा लसीकरण बंद ठेवावे लागले आहे. यामुळे नागरिकांच्या रोषाला महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधीना सामोरे जावे लागले आहे. त्याच दरम्यान आता पुन्हा लसीकरण सुरू झाले आहे. तर काही खासगी रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्या ठिकाणी सहाशे रुपयांपासून बाराशे रुपयांपर्यंत दर आकारत आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांच्या लसीकरणासाठी एकसमान दर आकारले जावे, अशी मागणी देखील त्यांनी केली.

महापौर मोहोळ पुढे म्हणाले, ‘खासगी रुग्णालयांकडून होणारे लसीकरण हे महापालिकेच्या यंत्रणेला मदत करणारेच आहे. खासगी केंद्रांनाही व्यवस्थापन आणि वैद्यकीय खर्च यासाठी लागत आहे. ही बाजूही आपण समजून घेत असून खासगी रुग्णालयांचेही नुकसान होऊ नये आणि नागरिकांनाही दरांबाबत त्रास होऊ नये, ही माझी भूमिका आहे.