October 27, 2025

महापालिकेत समाविष्ट गावांचा विकास ठप्प, नागरिकांची लूट ; राष्ट्रवादी काँग्रेसचे गाजर-रताळी आंदोलन

पुणे, १४ जुलै २०२५ ः पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ३२ गावांना विकासापासून दूर ठेवण्यात येत असून, पुणे मनपा आणि महायुती सरकारकडून करदात्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) वतीने या विरोधात ‘गाजर व रताळी आंदोलन’ करण्यात आले.

हे आंदोलन पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली मनपाच्या मुख्य कार्यालयाबाहेर (शिवाजीनगर) करण्यात आले. यावेळी प्रशासन आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त करण्यात आला.

जगताप यांनी सांगितले की, “मांजरी बु. सह पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांना पुणे महानगरपालिकेने सातत्याने विकासा पासून वंचित ठेवले आहे. येथील मिळकत धारकांना ४० टक्के मिळकत कर सवलतीचे व विकासाचे गाजर दाखवून, प्रत्यक्षात मात्र करावर २ टक्के सावकारी व्याज दंड लावून महायुती सरकार व पुणे महापालिका प्रशासन नागरिकांची लूट करत आहे. हे अन्यायकारक आणि अस्वीकार्य असू या लुटीच्या निषेधार्थ हे आंदोलन करत आहोत.”

जर तात्काळ ३२ गावांतील नागरी सुविधांचे काम हाती घेण्यात आले नाही आणि दंडात्मक व्याज रद्द करण्यात आले नाही, तर येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने दिला.

आंदोलनात रवींद्र माळवदकर, उदय महाले, आशाताई साने, गजेंद्र मोरे, किशोर कांबळे, वैशाली थोपटे, दिलशाद अत्तार, पूजा काटकर, रमिझ सैय्यद, असिफ शेख, गणेश नलावडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.