मुंबई, १८ जुलै २०२५ः पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या धानोरी, वडगावशेरी आणि खराडी परिसरात दरवर्षी पावसामुळे निर्माण होणाऱ्या भीषण परिस्थितीवर ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी विधानभवनात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात केली.
पठारे यांनी अधिवेशनात बोलताना सांगितले की, “धानोरी, वडगावशेरी व खराडी ही गावे २९ वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट करण्यात आली, तरीही आजपर्यंत या भागांतील नागरिकांना पावसाळ्यात दरवर्षी पूरस्थितीचा सामना करावा लागतो. प्रशासनाने पुरेसे लक्ष दिलेले नाही.”
जून २०२४ मध्ये धानोरीतील इंद्रप्रस्थ, लक्ष्मीनगर, धनलक्ष्मी, श्रीराम व्हिला, मयूर किलबिल या सोसायट्यांत पावसाचे पाणी घरांमध्ये घुसले, त्यामुळे नागरिकांचे घरगुती साहित्य, महत्वाची कागदपत्रे, वाहने आणि लहान मुलांचे साहित्य वाहून गेले. महापालिकेने उभारलेला तात्पुरता नाला अपुरा ठरला असून त्यात ड्रेनेज पाणी मिसळल्याने रोगराईचा धोका वाढला आहे. या नाल्याची भिंतही मोडकळीस आली असून मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
वडगावशेरीतील शुभम, गार्डनिया, गणराज हाइट्स, सेंट अरनॉल्ड शाळा, उज्वल गार्डन, आनंद अपार्टमेंट, करण घरोंदा आणि खराडीतील थिटेवस्ती, लेन क्रमांक १० मध्येही दरवर्षी पुरसदृश परिस्थिती उद्भवते. नागरिकांना याचा त्रास वारंवार सहन करावा लागत आहे.
पठारे यांनी सरकारकडे पुढील तातडीच्या उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे:
-धानोरी परिसरात नवीन पावसाळी नाल्यांचे नियोजन करून तत्काळ काम सुरू करणे
-बुजवले गेलेले नाले त्वरित उघडणे व नियमित स्वच्छता करणे
-नैसर्गिक नाल्यांचे मार्किंग करून अतिक्रमण रोखण्यासाठी यादी प्रकाशित करणे
-मोडकळीस आलेल्या भिंतींची तातडीने पुनर्बांधणी करणे
-पावसाचे व सांडपाण्याचे पाणी एकत्र होणार नाही, यासाठी स्वतंत्र वाहिन्या विकसित करणे
“शासनाने या भागाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची नितांत गरज आहे, अन्यथा नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता धोक्यात येईल,” असा इशारा पठारे यांनी दिला.
More Stories
तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी Rs ५९.७५ कोटी निधीस मान्यता
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे: महाराष्ट्र शासन शहरात कर्करोग रुग्णालय कधी उभारणार; आमदार पठारे यांची मागणी