म्युकरमायकोसिसपासून संरक्षणासाठी मधुमेह रुग्णांनी रक्तशर्करा नियमित तपासावी, तसेच स्टिरॉईडसचा अतिरेक टाळावा- डॉ राजीव जयदेवन

पणजी, 03 जून 2021: कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मधुमेह आणि स्टिरॉईडसचा अप्रमाणात वापर यामुळे प्रतिकारक शक्ती कमकुवत होते, त्यामुळे म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य संसर्गाची लागण होण्याची शक्यता जास्त निर्माण होते, अशी माहिती केरळ भारतीय वैद्यकीय परिषदेचे उपाध्यक्ष डॉ राजीव जयदेवन यांनी दिली. डॉ राजीव जयदेवन आणि दंतचिकित्सक डॉ नीता यांनी पत्र सूचना कार्यलायाने आयोजित केलेल्या कोविड-19, म्युकरमायकोसिस आणि दातांची स्वच्छता” या विषयावरील वेबिनारमध्ये मार्गदर्शन केले.

म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य संसर्गाविषयी माहिती देताना डॉ राजीव जयदेवन म्हणाले की, पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतात या संसर्गाची लागण जास्त दिसून येते, कारण आपल्याकडे स्व-उपचारावर अजूनही जास्त भर दिला जातो. कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मधुमेह रुग्णांनी नियमित रक्तशर्करा तपासावी तसेच स्टिरॉईडसचा वापर केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. रक्तातील साखर वाढल्यास रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. ज्यामुळे, न्युट्रोफिलसारख्या पांढऱ्या पेशींवर परिणाम होतो. कोविड रुग्णांच्या तुलनेत म्युकरमायसोसिस रुग्णांचे प्रमाण अगदीच नगण्य असल्याचे ते म्हणाले.

बुरशी गोड पदार्थ आणि जस्तावर लवकर वाढते. बुरशी आपल्या पेशींवर हल्ला करते. त्यामुळे पेशी मृत होतात, त्यावेळी त्यांचा रंग काळा होतो. यामुळे याला काळी बुरशी असे साधारणपणे म्हटले जाते. मात्र, कोणत्याही रंगावरुन याला नाव देण्यापेक्षा म्युकरमायकोसिस असेच संबोधणे योग्य असल्याचे डॉ राजीव म्हणाले.

कोविड संक्रमणात लक्षणविरहीत रुग्णांनी औषधोपचार टाळावा. योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि अगदीच आवश्यकता भासल्यास पॅरासिटीमलचा वापर करावा, अशी माहिती डॉ राजीव यांनी दिली. स्व-उपचार हे म्युकरमायसोसिसला आमंत्रण आहे, असे ते म्हणाले. मात्र, 5-6 दिवसानंतर जर लक्षणांमध्ये वाढ झाली, जसे थकवा जाणवणे, श्वसनास त्रास होणे, जेवणाची इच्छा न होणे, छातीत दुखणे किंवा अस्वस्थ वाटणे तर तुम्ही रुग्णालयात जावे किंवा डॉक्टरांशी दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क करावा.

लसीकरणामुळे प्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे आपसूकच म्युकरमायकोसिसपासून बचाव होतो, असे आतापर्यंत दिसून आले आहे. त्यामुळे लसीकरण महत्त्वाचे असल्याचे डॉ राजीव यांनी सांगितले.

कोरोना संक्रमणातून बरे झालेल्या रुग्णांनी काही आठवड्यांपर्यंत स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांत असे आढळून आले आहे की, मधुमेह रुग्ण आणि अवयव प्रत्यारोपण केले नाही, अशांमध्येही म्युकरमायसोसिचा संसर्ग आढळून आला आहे, हा नवीन प्रकार असून याविषयी अभ्यास सुरु आहे.

गरम पाण्यातून वाफ घेण्याविषयी माहिती देताना डॉ राजीव म्हणाले की, वाफ घेऊन कोणताही विषाणू मरत नाही. उलट, शरीरात उपयोगी असलेल्या जीवाणूंना याचा फटका बसतो. वाफ घ्यायची असल्यास अगदी सौम्य घ्यावी, तसेच त्यात कोणतीही पाने वा घटक यांचे मिश्रण करु नये. बुरशी ही आपल्या आसपासच्या सर्वच घटकांवर असते. बुरशी शेकडो वर्षांपासून अस्तित्वात आहे. त्यामुळे एकदम घाबरुन सर्वच वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्याची आवश्यकता नसल्याचे डॉ राजीव म्हणाले.

कोविड-19 संक्रमण परिस्थितीत दाताच्या आरोग्याविषयी बोलताना दंतचिकिस्तक डॉ नीता यांनी सांगितले की, बुरशी कोणत्याही अस्वच्छ घटकावर वाढते. त्यामुळे नैसर्गिक जीवाणू सुरक्षित ठेवून बुरशीपासून संरक्षणासाठी नियमितपणे दोन वेळा दातांची स्वच्छता, माऊथवॉशचा वापर करणे आवश्यक आहे. दात काढल्यानंतर ती जागा आणि एकूण तोंडाची स्वच्छता महत्त्वाची आहे, असे डॉ नीता म्हणाल्या.

पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक डी.व्ही.विनोदकुमार यांनी वेबिनारचे प्रास्ताविक केले. तर, धनलक्ष्मी यांनी वेबिनारचे सूत्रसंचालन केले.

वेबिनार लिंक- https://www.youtube.com/watch?v=PKV14R37BLU