करोनातून बरे झालेल्या मधुमेहींमध्ये आढळतोय म्युकोरमायकोसिस आजार

पिंपरी, 5 मे 2021: कोरोनपश्चात रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या मधुमेही रुग्णांमध्ये जबड्याच्या व जबड्याच्या वरील सायनसमध्ये काळसर बुरशी तयार होऊन म्युकोरमायकोसिस या आजाराची लक्षणे आढळली आहेत. दुसऱ्या लाटेनंतर अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, अशी माहिती पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या दंतरोग विभागाचे प्रमुख डॉ.यशवंत इंगळे यांनी दिली.

डॉ. इंगळे म्हणाले,” म्युकोरमायकोसिस ही बुरशी पर्यावरणात नैसर्गिक रित्या अस्तित्वात असते परंतु प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर या प्रकारच्या बुरशीचा शरीरामध्ये संसर्ग होतो. श्वासोच्छ्वासावाटे या बुरशीचे कण शरीरात गेल्यानंतर फुप्फुस तसेच वरच्या जबड्यातील सायनस मध्ये आणि वरच्या जबड्यामध्ये दुष्परिणाम होतो. कोरोनपश्चात रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या मधुमेही रुग्णांमध्ये हे आजार वाढले असल्याचे दिसून आले आहे. वाय सी एम रुग्णालयात कान नाक, घसा विभाग आणि दंतरोग विभागांमध्ये अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, रुग्णालयातील डॉ.अनिकेत लाठी, डॉ आदित्य येवलेकर, डॉ.कौस्तुभ कहाणे, डॉ यशवंत इंगळे यांच्या सहकार्याने या शास्रक्रिया करण्यात आल्या.

 या आजाराची कारणे :
रुग्णाची प्रतिकारशक्ती क्षीण झालेली असेल आणि मधुमेही रुग्णाचे रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित असेल आणि रुग्णास कोविड उपचारा दरम्यान अतिप्रमाणात स्टिरॉइड आणि वायरल लोड, सायटोकाइन स्टॉर्म कमी करण्यासाठी रेमडेसीविर आणि सारखे इंजेक्शन दिल्यामुळे सिरम आयर्न चा लोड वाढतो. परिणामी शरीरात या बुरशीचा संसर्ग फैलावतो. म्युकोरमायकोसिस या आजारामध्ये काळसर बुरशीचा संसर्ग वाढून प्रसंगी डोळ्यार्यंत आणि मेंदूपर्यंत प्रादुर्भाव होऊ शकतो.

मुकोरमायकोसिस आजाराची लक्षणे:
१)तीव्र डोकेदुःखी, अंगात सतत बारीक ताप असणे
२)गालावर सूज किंवा बधिरपणा येणे
३)नाक गळणे
४) वाचा जबड्यातील हिरड्यांवर पू असलेल्या पुळ्या येणे
५)वरच्या जबड्यातील दातांचे हलणे
६)जबड्याची टाळू आणि नाकातील त्वचा यांचा रंग काळसर होणे.
७)वरच्या जबड्याच्या टाळूला किंवा वरच्या भागाला छिद्र पडणे.

 काय करावे :
१)तोंडामध्ये आणि नाकातील पोकळ्याना सौम्य निर्जंतुकीकरण द्रावणाने धुणे किंवा वॉश देणे.
२)मधुमेही रुग्णांना उपचारादरम्यान स्टिरॉइड व इतरइंजेक्शनचा नियंत्रित वापर करणे.
३) रोगप्रतिकारशक्ती वर्धक बाबींचा आहारामध्ये समावेश करणे.
४)लक्षणे आढळल्यास लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि उपचार करणे.