डिएगो ज्युनियर्सचे अपराजित्व कायम, युपीएसएवर सहज विजय

पुणे, 15/5/2022 – दिएगो ज्युनिएर्स क्लबने पीडीएफए फुटबॉल लीग स्पर्धेत आपले अपराजित्व कायम राखताना अ गटातून आपली आघाडी कायम राखली. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी झालेल्या सामन्यात त्यांनी युनायटेड पूना स्पोर्टस अकादमीचा १-० असा पराभव केला.

 

सामन्यातील एकमात्र गोल इवान लाझरस याने ३६व्या मिनिटाला केला. या सामन्यानंतर अ गटात दिएगो ज्युनिएर्स संघाने ३ सामन्यातून सात गुणांची कमाई करून आपली आघाडी कायम राखली. दिएगो ज्युनिएर्स स्पर्धेत अजून अपराजित आहे.

 

दरम्यान, याच गटातून डेक्कन सी आणि एफसी बेकडिन्हो यांनी आपले सामने बरोबरीत सोडवून गटातील अपराजित्व कायम राखले. डेक्कन सी संघाने सनी डेजला १-१ असे बरोबरीत रोखले. हर्षल दिक्षीत याने १५व्या मिनिटाला गोल करून डेक्कन सी संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर सामन्याच्या ६०व्या मिनिटाला विनायक अनमोल याने सनी डेजला सामन्यात बरोबरी राखून दिली. डेक्कन सीचे दोन सामन्यातून चार गुण झाले आहेत. नंतर झालेल्या सामन्यात एफसी बेकडिन्हो क्लबने एफसी जोसेफ संघाला २-२ असे बरोबरीत रोखले. सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला मोहन पाटिलने एफसी बेकडिन्होचा पहिला गोल नोंदवला. त्यानंतर एफसी जोसेफकडून प्रविण नागरी याने प्रथम २६व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली आणि नंतर ३४व्या मिनटिला त्याने दुसरा गोल करून क्लबला आघाडीवर नेले. मात्र, त्यांना आघाडी टिकवता आली नाही. सामन्याच्या ५३व्या मिनिटाला सौरभ पाटिल याने एफसी बेकडिन्होला बरोबरी साधून दिली. एफसी बेकडिन्होचे २ सामन्यातून चार, तर एफसी जोसेफचे ३ सामन्यातून चार गुण झाले आहेत.

 

डी गटातील सामन्यात डायनामाईटस संघाने सुरज लाडने ३५व्या मिनिटाला नोंदवलेल्या गोलच्या जोरावर खडकी ब्लूजचा १-० असा पराभव केला.

 

निकाल –

सप महाविद्यालय द्वितीय श्रेणी गट अ

दिएगो ज्युनिएर्स १ (इव्हान लाझरस ३६वे मिनिट) वि.वि. युपीएसए ०

डेक्कन सी १ (हर्षल दिक्षीत १५वे मिनिट) बरोबरी वि. सनी डेज १ (विनायक अनमोल ६०वे मिनिट)

एफसी बेकडिन्हो २ (मोहन पाटिल ३रे मिनिट, सौरभ पाटिल ५३वे मिनिट) बरोबरी वि. एफसी जोसेफ (प्रविण नागरी २६, ३४वे मिनिट)

 

गट ड डायनामाईटस १ (सुरजद लाड ३५वे मिनिट) वि.वि. खडकी ब्लूज.