वातावरणीय बदलांमुळे कमी होत जाणाऱ्या मान्सूनच्या पावसामुळे महाराष्ट्रातील दुष्काळ-प्रवण क्षेत्रांमध्ये वाढ: अभ्यास

मुंबई, ८ जुलै २०२२: वातावरणीय बदलांमुळे मान्सूनचा पाऊस कमी झाल्याने महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. अलीकडेच करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये नमूद केले आहे की, मान्सूनपूर्व व मान्सूननंतर उच्च, अति उच्च व गंभीर स्वरुपातील दुष्काळ प्रवण क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

 

परिणामी, मान्सूनपूर्व हंगामामध्ये या भागातील जलाशयातील पाणी घटत आहे. या अभ्यासात असेही नमूद केले आहे की, मान्सूनपूर्व कालावधीत सिंचन व इतर उद्देशांसाठी पाण्याचा वापर करण्याची भागाची क्षमता सातत्याने कमी होत आहे.

या अभ्यासाच्या लेखकांनी लातूर व्यतिरिक्त मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील परिस्थिती नाजूकच असल्याचा इशारा दिला आहे. यामध्ये बीड, उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि धुळे यांचा समावेश होतो. या ठिकाणच्या शेतकऱ्यांना ज्वारी, बाजरी, ऊस व इतर पिकांच्या बाबतीत दुष्काळामुळे उद्भवणाऱ्या संकटांना सामोरे जावे लागू शकते.

 

‘मॉनिटरींग ड्रॉट पॅटर्न फॉर प्रि अॅण्ड पोस्ट मान्सून सीझन्स इन अ सेमी-ॲरीड रिजन ऑफ वेस्टर्न इंडिया’ (Monitoring drought pattern for pre- and post-monsoon seasons in a semi-arid region of western India)

 

या अभ्यासात पिके आणि पाणी यासारख्या अनेक निकषांबद्दल सॅटेलाइट आकडेवारी वापरून १९९६ ते २०१६ या कालावधीत लातूर जिल्ह्यातील वाढत्या दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. या अभ्यासात काही शिफारसीही दिलेल्या आहेत. यात दुष्काळाच्या वाढत्या प्राधान्याच्या प्रमाणात अंदाज करणे आणि त्याचे निरीक्षण करणे समाविष्ट आहे. अलीकडेच हा अभ्यास ‘एन्व्हायरोन्मेंटल अँड असेसमेंट’ या पिअर रीव्ह्यूड (या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर तज्ज्ञांकडून मूल्यमापन करून घेतलेले) स्प्रिंगर-नेचर जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

 

“वारंवार पडणारा दुष्काळ आणि लातूरमधील दुष्काळग्रस्त प्रदेशात होणाऱ्या वाढीसाठी वातारवरणीय बदलामुळे मान्सूनच्या पावसात झालेली घट हे प्रमुख कारण आहे”, असे या अभ्यासाचे सहलेखक व नवी दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामियामधील नॅचरल सायन्सेसचे भूगोल विभागातील प्राध्यापक डॉ. अतिकूर रहमान म्हणाले. या भागात सिंचन व इतर वापरासाठी पाण्याची उपलब्धता मान्सूनपूर्व काळात सातत्याने कमी होताना दिसत आहे अशी त्यांनी अधिक माहीती दिली.

 

लातूरमध्ये दर आठ-नऊ वर्षांनी दुष्काळ पडतो. परिणामी पाणीटंचाई निर्माण होते आणि शेती कमी होतात. यामध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक लोक लातूर भागात, परिणामी दुष्काळ ही गंभीर समस्या झाली आहे, असे डॉ. रहमान यांनी सांगितले. “या समस्येमुळे अगणित लोकांचे आयुष्य पणाला लागले असून राष्ट्रीय हिताचा मुद्दा म्हणून केंद्र आणि राज्य शासनाने दुष्काळ नियंत्रणासाठी तातडीने नियोजन करणे गरजेचे आहे”, अशी पुष्टी त्यांनी जोडली.

 

अति उच्च असलेला दुष्काळी भाग (तापमान परिस्थिती निर्देशांक किंवा टीसीआयने याचे मापन होते, ज्याचा उपयोग तापमानातील फरकामुळे येणाऱ्या ताणाचे विश्लेषण करण्यासाठी केला जातो) १९९६ ते २०१६ या कालावधीत मान्सूनपूर्व काळात ५८ चौ. किमीपासून ६६४ चौ. किमीपर्यंत (१०४५%) वाढला आहे. तर मान्सूनपश्चात काळात ४४ चौ. किमीवरून ४८९ चौ. किमीपर्यंत पोहोचला आहे. एकीकडे हे होत असताना, व्हेजिटेशन कंडिशन इंडेक्स किंवा व्हीसीआयनुसार उच्च दुष्काळग्रस्त भाग मान्सूनपश्चात काळात १२६९ पासून १७८८ किमीपर्यंत पोहोचला असून, मान्सूनपूर्व काळात २१४० चौ. किमीवरून ३९६४ चौ. किमीपर्यंत पोहोचला आहे. ऐतिहासिक कलाशी तुलना करून व्हेजिटेशन हेल्थचे मूल्यमपान करण्यासाठी व्हीसीआय वापरतात.

 

“वातावरणीय बदल आणि पाऊस कमी झाल्याने लातूर जिल्ह्याला दुष्काळाचा मोठा इतिहास आहे आणि हा दुष्काळ वारंवार पडतो. संपूर्ण भागात दुष्काळाचे चार वेगवेगळ्या प्रकारांत वर्गीकरण होते: कमी, मध्यम, उच्च आणि गंभीर. १९९६ मध्ये उच्च दुष्काळ श्रेणी असलेले कमी भाग होते. या भागांमध्ये कालानुक्रमे वाढ होत गेली.”, असे या अभ्यासाचे मुख्य लेखक शाहफहाद म्हणाले. “आता जवळपास निम्मा भाग दुष्काळी झाला आहे.”, अशी पुष्टी त्यांनी जोडली.

 

या लेखकांनी विविध क्षेत्रे आणि संस्थांमधून अभ्यास केला आहे. या अभ्यासाच्या लेखकांमध्ये प्राध्यापक रहमान आणि शाहफहाद या व्यतिरिक्त डॉ. स्वपन तालुकादार, रईस अली आणि जामिया मिलिया इस्लामियाचे मोहम्मद वसीम नाइकू, तैवान येथील नॅशनल सेंट्रल युनिव्हर्सिटीमधील प्राध्यापक युई-आन लिउ आणि डॉ. किम-अन्ह नुयेन, बांगलादेश येथील बेगम रोकेया विद्यापीठातील डॉ. अबु रेझा मोहम्मद तौफिकुल इस्लाम आणि सौदी अरेबियामधील किंग खालिद विद्यापीठातील डॉ. जावेद मलिक यांचा समावेश आहे.

 

जागतिक स्तरावर दक्षिणेतील अनेक भागांमध्ये ही परिस्थिती अधिकाधिक बिकट होत जाणार आहे, असा इशारा अनेक स्वतंत्र तज्ज्ञांनी दिली आहे. “जसजसे वातावरणीय तापमान वाढत जाईल, तुम्हाला जलविज्ञान चक्र अधिक तीव्र झाल्याचे आढळून येईल. खूप दुष्काळ पडतील, पूर येतील आणि अतिवृष्टी होईल.”, असे कोलंबिया विद्यापीठातील वातावरण विज्ञानावरील कार्यक्रमाला मार्गदर्शन करणारे अमेरिकन अॅडजन्क्ट प्राध्यापक जेम्स हॅनसेन म्हणाले.

गेल्या महिन्यात (१ जून ते १ जुलै २०२२) लातूरमध्ये ३० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला. पण हवामान विभागानाने वर्तविलेल्या अंदाजानुसार यापुढील शिल्लक हंगामात सक्रिय पावसात घट होऊ शकते. भारतीय हवामान विभागानुसार भारतातील सामान्य पावसाच्या तुलनेने ज्या भागात १०% हून कमी पाऊस पडतो, तो दुष्काळग्रस्त भाग असतो. लातूर जिल्ह्याच्या पावसाची आकडेवारी पाहता असे दिसून येते की येथे दर पाच वर्षांनी दोन वेळा १०% हून कमी पाऊस पडतो. २०१५-१६ आणि २०१६-१७ मध्ये आलेल्या तीव्र दुष्काळांमुळे शेती व अनेक पाळी प्राण्यांवर गंभीर परिणाम झाला होता.

 

 

या अभ्यासातील प्रमुख शिफारशी

1. दुष्काळी परिस्थिती सतत ओढवल्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी संशोधक व नियोजकांनी दुष्काळावर लक्ष ठेवणे व अंदाज वर्तविणे याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे, अशी शिफारस या अभ्यासात करण्यात आली आहे.

2. हा मुद्दा राष्ट्रीय हिताचा असल्यामुळे राज्य व केंद्र सरकारने या भागातील दुष्काळाला आळा घालण्याबाबत विचार केला पाहिजे.

3. भारतातील ईशान्य भागातील शेती व जलस्रोतांवर दुष्काळाचे होणारे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी एकात्मिक दुष्काळ संनियंत्रण साधन विकसित करण्याची तातडीची आवश्यकता आहे.

4. विभाग व गाव पातळीवर असलेल्या सद्यस्थितीतील जलाशयांची निश्चिती करण्यावर व त्यांचे व्यवस्थापन करण्यावर राज्य सरकारने लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. सिंचनासाठी असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येला हाताळण्यासाठी कालवा सिंचनाचा प्रसार केला पाहिजे.