October 25, 2025

रजत कपूर दिग्दर्शित व अभिनेते विनय पाठक यांचा अभिनय असलेले ‘नथिंग लाईक लिअर’ या नाटकाचे पुण्यामध्ये प्रथमच प्रयोग

पुणे. दि. २ जानेवारी, २०२५ : चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते व दिग्दर्शक रजत कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि प्रसिद्ध रंगकर्मी विनय पाठक यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘नथिंग लाईक लिअर’ या नाटकाचा सिझन पहिल्यांदाच पुण्यामध्ये होत आहे. पुण्यातील महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकातील श्रीराम लागू रंग अवकाश येथे १०, ११ व १२ जानेवारी रोजी या नाटकाच्या एकूण पाच प्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी (१० जानेवारी रोजी) सायं ७ तर दुसऱ्या (११ जानेवारी) व तिसऱ्या (१२ जानेवारी) दिवशी सायं ५ आणि ८ अशा दोन वेळी नाटकाचे हे प्रयोग संपन्न होतील.

जगप्रसिद्ध नाटककार, कवी विल्यम्स शेक्सपियर यांच्या ‘किंग लिअर’ या मूळ नाटकावर आधारित असलेल्या ‘नथिंग लाईक लिअर’ या नाटकाची निर्मिती सिनेमटोग्राफ यांची आहे. विनय पाठक यांचा एकल अभिनय असलेले हे नाटक इंग्रजी / जिब्रीश या भाषेमध्ये असणार असून रजत कपूर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. नाटकाचा एकूण कालावधी हा १०५ मिनिटांचा आहे.

मानवी नातेसंबंध, नैराश्य आणि भावनिक संघर्ष यावर आधारित हे नाटक असून यामध्ये एका एकाकी विदूषकाची गोष्ट सांगण्यात आली आहे. जवळची व्यक्ती आयुष्यात निघून गेल्यानंतर लगेचच या विदुषकावर सादरीकरण करण्याची परिस्थिती ओढावते. जवळची व्यक्ती गमावल्याची भावना ताजी असताना मुखवटा घालून समोर बसलेल्या प्रेक्षकांना हसविताना त्याची झालेली मनस्थिती या नाटकात दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे हे विशेष.

‘नथिंग लाईक लिअर’ नाटकाचे सर्व प्रयोग हे सशुल्क असून सदर नाटकाची तिकिटे बुक माय शोवर उपलब्ध असल्याची माहितीही आयोजकांच्या वतीने कळविण्यात आली आहे.