गोड्या पाण्यातील ‘टार्डीग्रेड’ चा शोध: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाचा संशोधनपर अभ्यास

पुणे, 9/11/2021- अतिउच्च तापमानात तसेच अतिथंड वातावरणात अनेक वर्ष सुप्त (फ्रीज) अवस्थेत जिवंत राहणाऱ्या गोड्या पाण्यातील ‘टार्डीग्रेड’ या सुक्ष्मजीवाचा शोध लावण्यत व त्यावर मूलभूत अभ्यास करण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाला यश मिळाले आहे. भविष्यात या ‘टार्डीग्रेड’ चा उपयोग अंतराळातील संशोधनात होणार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातील संशोधन अभ्यासक कल्याणी भाकरे व प्राध्यापक डॉ. कल्पना पै यांनी ‘अक्वाटिक इकॉलॉजी’ या रिसर्च जर्नलमध्ये याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे.

‘टार्डीग्रेड’ बद्दल अधिक माहिती देताना प्रा. कल्पना पै म्हणाल्या, ‘टार्डीग्रेड’ ला ‘वॉटर बेअर’ या नावानेही संबोधले जाते. ‘टार्डीग्रेड’ची भारतात सर्वात आधी नोंद ही विसाव्या शतकाच्या सुरुवातीला झाली होती. तेव्हापासून यावर दीर्घकालीन अभ्यास झाला नव्हता. या आधीही जमिनीवर ‘टार्डीग्रेड’ आढळले होते मात्र गोड्या पाण्यातील ‘टार्डीग्रेड’ हे या अभ्यासादरम्यान आढळून आले. पावसाच्या पाण्यामुळे जी निसर्गनिर्मित डबकी तयार होतात त्यामध्ये हा सूक्ष्मजीव आढळला आहे.

‘टार्डीग्रेड’ हा असा सूक्ष्मजीव आहे जो वातावरणातील बदलांचा अंदाज घेत आपल्या शरीररचनेत त्याप्रमाणे बद्दल करतो. आतापर्यंतच्या निरीक्षणातून असे समोर आले आहे की त्याला योग्य वातावरण निर्माण होईपर्यंत अनेक वर्ष तो सूक्ष्मजीव सुप्त अवस्थेत राहतो. मुख्य म्हणजे सुप्त अवस्थेतून तो त्याच अवस्थेत बाहेर येतो, ज्या अवस्थेत तो सुप्त झाला होता, असेही डॉ. पै यांनी सांगितले.

कल्याणी भाकरे म्हणाल्या पश्चिम घाटात विविध जलचर परिसंस्था आहेत. या परिसंस्था वैविध्यपूर्ण सूक्ष्मजीवांसह इतर अनेक जलचरांचा अधिवास आहे . पावसाच्या पाण्यामूळे निर्माण झालेली तात्पुरती निवासस्थाने अशा मनोरंजक वस्तींपैकी एक आहेत ज्यात टार्डि ग्रेड सह अन्य जीव असतात .
वाढत्या इकोटूरिजम आणि मानवी हस्तक्षेपामुळे हे अधिवास धोक्यात आले आहे . या अधिवासांचे व त्यावर अवलंबून असलेल्या वनस्पती व प्राण्यांचे संवर्धन केले पाहिजे, अन्यथा या प्रजाती शोधण्यापूर्वीच नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे .

पृथ्वीला पर्यायी ग्रह शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत ज्यावर सजीवसृष्टी टिकू शकेल . परग्रहावर एखादा जीव जिवंत राहू शकेल का, याचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून हा सूक्ष्मजीव भविष्यात उपयोगी ठरू शकतो. त्यामुळेच या सूक्ष्मजीवविषयी व्यापक अभ्यास होणे गरजेचे आहे. इस्रो सारख्या संस्थांनी अशा संशोधनाकरिता अधिकाधिक संधी संशोधकांना उपलब्ध करून द्यायला हव्यात असेही भाकरे यांनी सांगितले.

कोट
प्राणीशास्त्र विभागातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थीनीने केलेला अभ्यास हा जैवविविधतेच्या दृष्टीने आणि भविष्यातील अंतराळातील संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. संशोधकांनी केलेले काम कौतुकास्पद आहे.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
—–