October 24, 2025

मंगेशकर रुग्णालयाचे संचालक मंडळ बरखास्त करा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

पुणे, ११ एप्रिल २०२५ : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापनात गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रुग्णालयाचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात जशी क्रूरता दिसून आली, तशीच क्रूरता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांसाठी दाखविल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्य सरकारने या धर्मादाय रुग्णालयाचे संचालक मंडळ बरखास्त करून तेथे शासनाचे प्रतिनिधी नियुक्त करावेत. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलचे सीडीआर तपासून डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

रुग्णालय धर्मादाय असल्याने सरकारने ते ताब्यात घ्यावे, असे सपकाळ म्हणाले. लता मंगेशकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचा आदर राखला पाहिजे, पण त्यांच्या नावाने चालणाऱ्या रुग्णालयात रुग्णांना योग्य वागणूक मिळत नसेल, तर ते योग्य नाही. चौकशी समित्यांचे अहवाल येतीलच, पण सरकारने मोबाईल सीडीआर आणि सीसीटीव्ही तपासून डॉ. केळकर आणि डॉ. घैसास यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

याच पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ या चित्रपटातील काही दृश्यांना सेन्सॉर बोर्डाने कात्री लावल्याबद्दल सरकारवर टीका केली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांच्या उद्धारासाठी कार्य केले, पण त्यांना छळणारे इंग्रज नव्हते, तर भारतीयच होते, असे त्यांनी सांगितले. तसेच, खासदार उदयनराजे भोसले यांनी मुलींची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केल्याचा दावा केला होता, त्यावरही सपकाळ यांनी टीका केली. मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली, हे जगाला माहीत आहे, त्यामुळे इतिहासाची मोडतोड करू नये, असे ते म्हणाले.