जलमय कोंढवा, एनआयबीएम, कात्रज परिसरातील विस्कळीत वीजपुरवठा सुरळीत

पुणे, दि. १८ ऑक्टोबर २०२२: पुणे शहर व परिसरात सोमवारी (दि. १७) रात्री नऊच्या सुमारास ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला. काही वेळातच सखल भागामध्ये पाणी साचले. घरांमध्ये तसेच सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. परिणामी महावितरणच्या वीजयंत्रणेला तडाखा बसला. यामध्ये प्रामुख्याने रास्तापेठ व पद्मावतीसह पर्वती, बंडगार्डन विभागामधील २२ केव्ही क्षमतेच्या ११ वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांना रात्रभर पावसात दुरुस्ती कामाला वेग देत पहाटेपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्वच ११ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरु केला. तसेच सकाळी १० वाजेपर्यंत जलमय परिसरातील ९९ टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. दुपारी ४ वाजेपर्यंत उर्वरित ग्राहकांकडील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येत आहे.

दरम्यान, पावसाचा कहर आणखी दोन दिवस राहणार असल्याची शक्यता असल्याने महावितरणचे पुणे परिमंडलातील अभियंते व कर्मचाऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा तसेच वीज सुरक्षेबाबत उपाययोजना करण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सोमवारी रात्रीच्या मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे रास्तापेठ विभागातील एनआयबीएम परिसर, सह्याद्री पार्क, साळुंखे विहार, कोंढवा, जेके पार्क, कुमार पृथ्वी, काकडेवस्ती, नंदादीप सोसायटी, कौसरबाग, टिळेकरनगरचा काही परिसर, सेरेना सोसायटी, दगडेवस्ती, धर्मावत पेट्रोल पंप परिसर, सांकला सोसायटी, शांतीबन, साईबाबानगर आदी परिसर तसेच पद्मावती विभागातील गंगाधाम, भिलारेवाडी, कात्रज, इस्कॉन मंदिर परिसर, सहकारनगर, वाळवेकरनगर आदी परिसरातील वीजयंत्रणेजवळ पाणी साचल्यामुळे वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. या भागात पावसाचे पाणी साचले होते. रस्त्याच्या कडेला असलेल्या फिडर पिलर, रिंगमेन युनिटमध्ये तसेच अनेक सोसायट्यांच्या मीटरबॉक्समध्ये व घरांमध्ये पाणी शिरले. काही ठिकाणी वीजयंत्रणेवर झाडाच्या मोठ्या फांद्या पडल्या. तसेच महावितरणकडून सुरक्षिततेचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद ठेवल्यामुळे रास्तापेठ व पद्मावतीसह पर्वती, बंडगार्डन विभागातील एकूण १८४ रोहित्रांवरील सुमारे ७७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी रात्रभर भर पावसात काम करून सकाळी आठ वाजेपर्यंत १६२ रोहित्रांवरील सुमारे ७० हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला. उर्वरित २२ रोहित्रांवरील सुमारे ६५०० ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी ४ वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात येत आहे. मात्र सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यास उशिर होत होता. तसेच काल रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शहराच्या इतर काही भागात विस्कळीत झालेला वीजपुरवठा देखील सुरळीत करण्यात आला आहे.