पुणे, दि. २८ मे २०२१: पुण्यातील नायडू हॉस्पिटल पूर्ण राज्यात आणि देशात माहित आहे. ब्रिटिशांनी प्लेगच्या वेळी स्थापन केलेले या रुग्णालयाने गेल्या शंभर वर्षात अनेक साथी पहिल्या आणि त्यावर उपचार केले. प्लेग, स्पॅनिश फ्लू, स्वाइन फ्लू, सार्स आणि आता कोवीड या सगळ्या आजाराचे पहिले काही रुग्ण येथेच दाखल झालेत. कोविडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील नर्स छाया जगताप याना फोन केल्यावर, पुन्हा देशपातळीवर नायडू हॉस्पिटलची चर्चा झाली.
पहिला फोन पुणे महापालिकेचे डॉक्टर संजीव वावरे यांना केला. डॉक्टर नायडू कोण होते आणि हॉस्पिटलला त्यांचे नाव का दिले? असे त्यांना विचारले. त्यांनी प्रामाणिकपणे सांगितले महापालिकेकडे कुठलीही नोंद नाही. जुने अधिकारी किंवा डॉक्टर्स सांगू शकतील. तसेच सिनियर डॉक्टर सुभाष कोकणे यांचा नंबर दिला आणि सांगितले हे किमान १९८० पासून नायडू हॉस्पिटलला येतात. मी त्यांना फोन केला. पण त्यांनीही प्लेग मध्ये नायडूंनी काम केले आहे, एवढेच सांगितले. त्यांनी सुचविले की, ससून मध्ये जुन्या डॉक्टरांना माहित असेल तर तपासा. ससूनला चौकशी केली, पुन्हा निराशा. अजून शहरातील एका जुन्या डॉक्टरांना फोन केला, पण त्यांनाही काही आठवत नव्हते. तरीही मी चिकाटी कायम ठेवली. मला माहित होते, पत्रकार राजू इनामदारकडे पुणे महापालिकेला शंभर वर्ष झाल्या निम्मित डॉक्टर मा. प. मंगुडकर यांनी १९६० साली लिहिलेल्या शताब्दी ग्रंथ आहे. ‘पुणे नगरसंस्था शताब्दी ग्रंथ’ या नावाचे पुस्तक, जे सध्या महापालिकेकडे पण उपलब्ध नाही. हा ग्रंथ म्हणजे खूप मोठा ठेवा आहे. खूप पाठपुरावा केला तेव्हा राजू यांनी तीन दिवसासाठी मला हे पुस्तक एकदा वाचायला दिले होते. मी त्यांना विनंती केली, मला डॉक्टर नायडू यांच्यावर लिहावयाचे आहे. माझ्यासाठी पुस्तक चाळा आणि काही माहिती आहे का सांगा. त्यांनी पण मदत केली पण पुस्तकातही काही माहिती मिळाली नाही.
शेवटी वर्तमानपत्राची डेडलाईन असते. चारपाच दिवस शोध घेऊन पण डॉक्टर नायडू नाही सापडले. म्हणून शेवटी, आहे त्या माहितीवर लेख लिहिला. लेखाचा अँगल बदलला आणि पुन्हा नायडू हॉस्पिटलवरच लिहिले, पण त्यात आवर्जून लिहिले की डॉक्टर नायडू कोण होते? हे महापालिका आणि जुन्या डॉक्टर्सला पण माहित नाही. तो लेख २ मार्च २०२१ ला हिंदुस्थान टाइम्स मध्ये प्रकाशित झाला आणि पुढे मी पण डॉक्टर नायडूंचा शोध थांबविला.
आमचे बोलणे झाले आणि शर्मिला या डॉक्टर नायडू यांच्या नातेवाईक निघाल्या. त्यांची आई डॉक्टर नायडू यांची नातं होती. सध्या डॉक्टर नायडू यांचे अकरा नातवंडे आहेत आणि त्या पैकी काही पुण्यात राहतात. डॉक्टर नायडूंचा मुलगा पद्माकर यांचा मुलगा विवेक यांचा नंबर दिला. ते सध्या पुण्यात राहतात. या दोघांनी मिळून मला डॉक्टर नायडूंबाबत खूप लेखी साहित्य पाठवले. जुने फोटो आणि त्यांना मिळालेले विविध पदक आणि बऱ्याच जुन्या आठवणी सांगितल्या.
दरम्यान विवेक नायडू आणि माझी मैत्री जमली. ते मला मध्ये मध्ये फोन करू लागले. माझ्याकडे कोविडने प्रवेश केल्याचे समजल्याने चौकशी करू लागले. त्यांनी मला पाटबंधारे खात्यातील निवृत्त अभियंता भीम खेडकर यांचा नंबर दिला, जे विवेक यांचे वडील पद्माकर यांचे मित्र होते आणि नायडू कुटुंबियांचे शेजारी होते.
डॉक्टर नायडू कोण होते हे सांगण्यासाठी त्यांनी कोणकोणती पदे भूषवली ते देतो. त्यांचे पूर्ण व्यक्तिमत्व त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सहकारी गॊ. प्र. सोहोनीं यांनी लिहिल्येला लेखात आहे, तो लेख फेसबुकवर पूर्ण टाकत आहे. सर्वानी तो लेख अवश्य वाचावा. यातून पुण्याचा इतिहास पण समजेल आणि नायडू यांचे कार्य किती मोठे होते ते समजेल.
– कार्यकाल – (जन्म -१ जुलै १८८५, मृत्यू – २७ एप्रिल १९५२)
– निवास्थान – सध्याचे लुणावत हॉस्पिटल असलेली इमारत जी सोमवार पेठ जवळील दारूवाला पूल शेजारी आहे
– महाराष्ट्र आणि कर्नाटक वैद्यक परिषद अध्यक्ष -१९४४
– इंडियन मेडिकल अससोसिएशन, पुणे शाखा अध्यक्ष – १९२२ ते १९४६
– पुणे नगरपालिका अध्यक्ष – १९२८, १९२९, १९३२
– पुणे नगरपालिका सभासद (तत्कालीन वॉर्ड ६ मधून, निवडून आलेले) – १९२२ ते १९३९
– इंडियन मेडिकल असोसिएशन कलकत्ता मध्यवर्ती संस्थेचे सभासद
– राजा धनराजगिरी हायस्कूल डॉक्टर नायडू यांनी सुरु केले, त्याचे संस्थापक आणि तत्कालीन अध्यक्ष
– संस्थापक फेलो मॉडर्न संस्था व वाडिया कॉलेज
– डॉक्टर नायडू नेत्ररोग तज्ज्ञ होते
– मुंबई आणि पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य होते
– कॅम्प एज्युकेशन सोसायटी कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष – १९३६ ते १९५२
– पुण्यातील विविध शिक्षण संस्थांचे फेलो
– साऊथ इंडियन सरस्वती विद्यालय आश्रयदाते
– पुणे जिल्हा महारोग निवारण समितीचे सभासद
– पुणे बालसंगोपन संस्था अध्यक्ष
– पुणे डिप्रेस्ड क्लास मिशन सोसायटी अध्यक्ष
– लॉर्ड रे इंडस्ट्रियल संग्रहालय अध्यक्ष
– पुणे शहर मद्यपान बंदी समिती अध्यक्ष
– नाशिक मध्यवर्ती लष्करी शिक्षण संस्था कार्यकारी मंडळाचे सभासद
– या व्यतिरिक्त अनेक संस्थावर त्यांनी सभासद म्हणून काम केले
– १९३४ साली ब्रिटिशांनी त्यांना राव बहादूर ही पदवी स्वतःहून बहाल केली
– पुण्याचे पहिले महापौर बाबुराव सणस यांनी संसर्गजन्य रुग्णालयाला डॉक्टर नायडू यांचे नाव दिले
डॉक्टर नायडू यांचे पुणे शहर आणि देशासाठी एवढे मोठे काम पाहता, त्यांच्या कुटुंबीयांची असलेली छोटी अपेक्षा – डॉक्टर नायडू यांचे छायाचित्र नायडू हॉस्पिटल मध्ये लावावे आणि त्यांनी ज्या परिसरात काम केले त्या दारूवाला पूल ते रास्ता पेठ रस्त्याला त्यांचे नाव द्यावे, ही इच्छा पुणे महापालिका स्वतःहून पूर्ण करेल अशी अपेक्षा.
डॉक्टर नायडू यांनी पुणे नगरपालिकेत जे काम केले, ते तर आजच्या सर्व राजकीय नेत्यांनी आणि प्रशासनाने वाचावे. प्लेग नंतर डॉक्टर नायडू यांनी आरोग्य क्षेत्रात भरीव काम केले. ज्यामुळे आज पुण्यातील आरोग्यसेवा विस्तारलेली दिसते. आता कोवीड नंतर आरोग्य क्षेत्रात कसे काम करावे, याचे धडे त्यात सापडतील. फक्त पुणे नाहीतर देशभरातील महापालिका आणि नगरपालिकांना याबाबत काम करता येईल. ते मी दुसरया लेखात लिहीत आहे. विशेष म्हणजे या कामाचा अहवाल स्वतः डॉक्टर नायडू यांनी लिहिलेला आहे.
More Stories
अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चास मान्यता
औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलण्यास राज्य सरकारची मान्यता
पीएमपीएमएलतर्फे ‘मी पीएमपीएमएलचा प्रवासी’ स्पर्धेचे आयोजन