पुणे, 17 जानेवारी 2023 : अयोध्येत येत्या सोमवारी रामलल्ला विराजमान होत आहेत. अखंड हिंदुस्थानातील रामभक्तांसाठी ऐतिहासिक असा सोहळा असून, या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतील ‘अपने अपने राम’ या विशेष कार्यक्रमासाठी रामनगरी सज्ज झाली आहे.संस्कृती प्रतिष्ठान आणि शि. प्र. मंडळीतर्फे उद्या गुरुवारपासून (दि. १८) तीन दिवस सायंकाळी ६ ते ९ या वेळेत राम कथेचे आयोजन केले आहे, अशी माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, “टिळक रस्त्यावरील एसपी कॉलेजच्या मैदानावर भव्य रामनगरी उभारली असून, येथे अयोध्येतील राममंदिराच्या प्रतिकृती साकारण्यात आली असून, राममंदिरासमोरील व्यासपीठावर बसून डॉ. कुमार विश्वास राम कथेचे निरूपण करणार आहेत. हा परिसर पूर्णतः राममय झाला आहे. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता होणार्या रामकथेच्या उद्घाटनावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कार्यवाह सचिन भोसले, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, ह.भ.प. पंकज महाराज गावडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.”
“डॉ. कुमार विश्वास यांच्या ओघवत्या शैलीत, अमोघ वाणीत श्रीराम कथा ऐकण्यासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या लक्षात घेत भारतीय बैठक व खुर्च्या अशी ऐंशी हजार ते एक लाख लोकांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमावेळी कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. एसपी कॉलेजच्या मैदानालगत आठ ते दहा पार्किंगची सोय करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली आहे. तसेच फिरते शौचालय, प्रथमोपचार, ऍम्ब्युलन्स, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली असून, आपत्कालीन व्यवस्थेसह अग्निशामकदल तैनात करण्यात आले आहे,” असे मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केले.
अशी आहे पार्किंगची सोय
‘अपने अपने राम’ कथेसाठी येणाऱ्या भक्तांची संख्या लक्षात घेऊन कार्यक्रम स्थळाच्या नजीक दहा ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. जवळपास दीड हजार चारचाकी व १० हजार दुचाकी पार्किंग करता येईल, अशी ही व्यवस्था आहे. पेरूगेट भावे हायस्कुल, रेणुका स्वरूप शाळा, निलायम टॉकीज, लोकमान्यनगरच्या मागील बाजूस आंबील ओढा वसाहत, नूमवि मुलींची प्रशाला, न्यू इंग्लिश स्कुल टिळक रोड, नातूबाग मैदान बाजीराव रोड, टिळक रोड क्षेत्रीय कार्यालय, सणस मैदान परिसर, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

More Stories
Pune: आरपीआयच्या पुणे शहर महिला अध्यक्षपदी हिमाली कांबळे यांची निवड
लोकमान्यनगर पुनर्विकासावर संताप; “मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही म्हाडाचा अहवाल नाही, रहिवाशांवर अन्याय”
Pune: मुरलीधर मोहोळ जिल्हा प्रभारी, गणेश बिडकर पुणे महापालिका निवडणूक प्रमुख