पुणे: उंड्रीत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्याला अटक

पुणे, १७/०८/२०२१: अमली पदार्थाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तस्कराला पथकाने अटक केली. त्याच्याकडून ५६ हजारांचा अमंली पदार्थ, दुचाकी आणि मोबाईल असा १ लाख २६ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. अभिजित रवींद्र कोतवाल (वय २६ रा. वडगाव शेरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे अधिकारी व कर्मचारी कोंढवा परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी उंड्रीतील एका इमारतीजवळ तस्कर स्टॅम्प अमली पदार्थाची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस अंमलदार बोमदांडी यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून अभिजीत कोतवाल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अमली पदार्थ, मोबाईल, दुचाकी असा सव्वा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या पथकाने केली.