पुण्यात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह कारवाई सुसाट, कोरोनानंतर यंदा प्रथमच ब्रेथ अ‍ॅनालायझरचा वापर

पुणे, दि. ०१/०१/२०२३: कोरोनानंतर यंदा प्रथमच निर्बधमुक्त नववर्षांचे स्वागत  पुणेकरांनी अतिशय उत्साहात केले. महामारीनंतर पोलिसांनी यंदा प्रथमच ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह कारवाईसाठी ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनचा वापर केला. त्यामुळे दंडात्मक कारवाई वाढल्याचे दिसून आले आहे.  ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हप्रकरणी २०२० साली ४६० जणांविरूद्ध दंडुका उगारण्यात आला होता. तर २०२१ मध्ये  १३२ जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली. दरम्यान, पोलिसांच्या आवाहनानुसार नागरिकांनी शिस्तीचे दर्शन घडवित नववर्षांचे स्वागत केल्याचे दिसून आले.

“नववर्षांचे स्वागत करताना  नागरिकांनी पुणे पोलिसांच्या आवाहनाला दाद दिली आहे. नियमांचे पालन करीत  पोलिसांसह वाहतूक कर्मचार्‍यांना सहकार्य केले. दरम्यान, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मद्यपान करून वाहन चालविणार्‍यांचे प्रमाण वाढल्याचे कारवाईवरून दिसून आले आहे.” – विजयकुमार मगर,  पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

पुणेकरांनी नववर्षांचे स्वागत करताना संयम ठेवून आनंद साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार काल मध्यरात्री अकरा वाजेनंतर शहरातील बहुतांश रस्त्यावर नागरिक दिसून आले नाही. फर्ग्युसन रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, एम. जे रस्ता, कॅम्प, कोरेगाव पार्कसह ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर तरूणाई  जल्लोष करताना दिसून आली. प्रामुख्याने शहरभरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. विशेषतः महिला छेडछाड रोखणे, गर्दीवर नियंत्रण ठेवणे, गर्दीचा फायदा घेउन चोरट्या टोळ्यांविरूद्ध कारवाई करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले होते. साध्या वेषातील कर्मचार्‍यांसह महिला पथक, दामिनी पथक आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी विविध ठिकाणी कायदा सुव्यवस्थेची चोख कामगिरी बजाविली. मध्यवर्ती शहरासह उपनगरांमधील वाहतूक सुरळित ठेवण्यासाठी वाहतूक विभागाचे कर्मचारी अधिकारी रात्री दोन वाजेपर्यंत   ड्युटी करीत असल्याचे दिसून आले.

कोरोनानंतर यंदा प्रथमच मोठ्या उत्साहात नववर्षांचे स्वागत करण्यात आले.  कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमवीर रात्री बारा वाजेनंतर  पोलिसांनी फर्ग्युसन रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, एम. जे रस्ता, कॅम्प, कोरेगाव पार्कसह ठिकठिकाणी ठिकठिकाणी पायी पेट्रोलिंगला प्राधान्य दिले होते. त्याशिवाय रात्री उशिरा नाकाबंदीदरम्यान चौकाचौकात वाहन तपासणी करण्यात येत होती. त्यामध्ये विना हेल्मेट, विना लायसेन्स, विना मास्क चालकांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला. विशेषतः ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह मद्यपान करून वाहन चालविणार्‍या  जणांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. दोन वर्षापुर्वी ड्रंक अ‍ॅॅण्ड ड्राईव्ह करणार्‍या ४६० जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली होती. यंदा मात्र, कारवाईचे प्रमाण वाढले आहे.

ब्रेथ अ‍ॅनालायझरद्वारे तपासणी  

मागील वर्षी कोरोना संसर्गाच्या प्रादुभार्वामुळे ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह करणार्‍याविरूद्ध कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनचा वापर केला नव्हता. त्यामुळे कारवाईचे प्रमाणही घटले होते. यंदा मात्र, नाकाबंदीदरम्यान ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनद्वारे तपासणीवर भर देण्यात आला होता. त्यामुळे दंडात्मक कारवाई मोठ्या प्रमाणावर करण्यात आली.