बांधकाम कामगार यांच्या आरोग्य व सुरक्षा विषयक तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी करावी – अपर कामगार आयुक्त शैलेंद्र ब. पोळ

पुणे दि. १०/०६/२०२१: अपर कामगार आयुक्त शैलेंद्र ब. पोळ यांनी पुणे विभागातील बांधकाम व्यावसायिकांना आवाहन केले इमारत व इतर बांधकाम कामगार ( रोजगार व नियमन व सेवाशती) अधिनियम, १९९६ अंतर्गत आपले आस्थापनेत कार्यरत बांधकाम कामगार यांच्या आरोग्य व सुरक्षा विषयक तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी करावी. दरवर्षी मुसळधार पावसाने व वादळी वाऱ्याने बांधकाम आस्थापनेच्या ठिकाणी अपघात होऊन बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंबीय मृत्युमुखी पडत असल्याच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सर्व बांधकाम आस्थापना मालकानी बांधकामाच्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना किंवा अपघात होणार नाही याची पुरेपुर काळजी घेणे आवश्यक आहे. सर्व बांधकाम कामगारांना सुरक्षा विषयक सर्व साहित्य / साधने उपलब्ध करून द्यावीत तसेच बांधकाम कामगारांचे व त्याचे कुटूंबीयाची राहण्याची सोय (लेबर कॅम्प) सुरक्षीत ठिकाणी करुन त्यांना आवश्यक त्या सोईसुविधा करुन देण्यात याव्यात. सर्व मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी सुरक्षा परिक्षण (सेप्टी ऑडीट) पूर्ण करुन घ्यावे. सेप्टी ऑफीसर नेमावा व त्यास विशेष सतर्क रहाण्याच्या सुचना घ्यावात.

प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाने (ज्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कामगार / कर्मचारी एकुण १० पेक्षा जास्त असतील अशांनी) उक्त अधिनियमाअंतर्गत मालक म्हणून नोंदीत होणे कायद्याने बंधनकारक आहे. अद्यापी नोंदणी केली नसल्यास ऑनलाईन (Ims.mahaonline.gov.in) या संकेतस्थळावर नोंदणी करावी. बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात ऑनलाईन पध्दतीने mahabocw.in या संकेत स्थळावर करुन घ्यावी.. नोंदीत बांधकाम कामगारांनाच कामावर नेमावे. अनोंदीत कामगार असल्यास प्राधान्याने त्यांची नोंदणी करुन खातरजमा व्यक्तीशः करावी. मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या जातात त्या सर्व योजनांचे सर्व लाभ बांधकाम कामगारांना मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहकार्य करावे काही अडचण आल्यास या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.