पुणे: जेसीबीच्या खोदकामात वीजवाहिनी तोडल्याने धायरी, डिएसके विश्व परिसरात वीज खंडित

पुणे, दि. २८ मार्च २०२२: डिएसके विश्व परिसरात पाण्याच्या पाईपलाईनसाठी जेसीबीद्वारे सुरु असलेल्या खोदकामात सोमवारी (दि. २८) दुपारी १.२० वाजता महावितरणची २२ केव्ही क्षमतेची भूमिगत वीजवाहिनी तोडली. परिणामी डिएसके उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडल्याने धायरी गाव, डिएसके विश्व, रायकर मळा, सिंहगड रस्त्याचा काही भाग येथील सुमारे २५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

 

दरम्यान पर्यायी व्यवस्थेतून दुपारी वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता. मात्र त्यातील ओव्हरहेड तार तुटल्याने वीजपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला. भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम रात्री ७.३० वाजेपर्यंत पूर्णत्वास गेले होते. त्यानंतर चाचणी घेऊन रात्री ८.१५ वाजेपर्यंत सर्व परिसरातील वीजपुरवठा सुरु करण्यात येत आहे.

 

याबाबत माहिती अशी की, नांदेड सिटी २२० केव्ही उपकेंद्रातून राजयोग २२ केव्ही भूमिगत वाहिनीद्वारे महावितरणच्या डिएसके उपकेंद्राला वीजपुरवठा केला जातो. डिएसके विश्व परिसरात पाइपलाईनसाठी जेसीबीद्वारे आज खोदकाम सुरु आहे. त्यामध्ये ही राजयोग वीजवाहिनी तोडण्यात आल्याने डिएसके उपकेंद्राचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद पडला. परिणामी या उपकेंद्रातून निघणाऱ्या चारही वीजवाहिन्यांवरील धायरी गाव, रायकर मळा, डिएसके विश्व व सिंहगड रस्त्याचा काही भाग या परिसरातील वीजपुरवठा दुपारी १.२० वाजता खंडित झाला. यातील आणखी एका प्रकारात डिएसके विश्व येथील महावितरणच्या रिंगमेन युनीट जवळ आग लागल्याने तेथील वीजवाहिन्यांना मोठी झळ बसली व त्याचीही तातडीने दुरुस्ती करावी लागली.

 

महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांनी पर्यायी वीजपुरवठ्यासाठी ताबडतोब तांत्रिक उपाययोजना केली व दुपारी ४.१५ वाजता सर्व परिसरातील वीजपुरवठा सुरु केला होता. मात्र सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पर्यायी व्यवस्थेमधील एक ओव्हरहेड वीजतार तुटल्याने वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला. दरम्यान रात्री ७.३० वाजेपर्यंत तोडलेल्या भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्णत्वास गेले होते. त्यानंतर चाचणी घेऊन रात्री ८.१५ वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे. खंडित वीजपुरवठ्याबाबतची माहिती संबंधित वीजग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळविण्यात आली.