माजी बार असोसिएशनच्या अध्यक्षावर फसवणूकीचा गुन्हा दाखल, फसवणूक झाल्यामुळे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे, २ सप्टेंबर २०२२: पुणे बार असोसिएशन चे माजी अध्यक्ष ऍड. सतीश गजानन मुळीक (रा. वडगावशेरी) यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चंद्रशेखर रमेश गलांडे (40, रा. भैरवनाथ मंदिरा जवळ वडगाव शेरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. गलांडे याने ऍड. मुळीक यांनी फसवणूक केल्यामुळे झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

येरवडा पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऍड सतीश मुळीक हे चंद्रशेखर गलांडे यांच्या जमिनीची केस चालवत होते. गलांडे यांची जमीन परत मिळवून देण्याकरिता त्यांच्याकडून 15 लाख रुपये रोख घेतले होते. मात्र त्यांच्या जमिनीच्या केसचे काम केले नाही. या उलट गलांडे यांची वडिलोपोर्जित 6.17 गुंठे जमीन ही प्रति तीस लाख रुपये विकत घेऊन ती एका बिल्डरच्या नावे केली. त्या व्यवाहारातील ऍड. मुळीक यांनी 86.45 लाख रुपये न देता फसवणूक केल्याचे गलांडे यांचे म्हणणे आहे. या कारणावरून दि. 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार च्या सुमारास ब्रम्हा सन सिटी समोर झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न गलांडे यांनी केला. गलांडे यांना त्रास होऊ लागल्याने बेशुद्ध अवस्थेत त्यांचे बंधू अतुल गलांडे यांनी उपचारा करिता रुग्णालयात नेले. गलांडे यांची प्रकृती स्थिर असून त्यांची व कुटूंबाची ऍड मुळीक यांनी घोर फसवणूक केल्यामुळे आत्महत्या करत असल्याची चिठी देखील त्यांच्या खिशात सापडली आहे. गलांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ऍड. मुळीक यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड करत आहेत.