मुंढव्यातील खोदकामांमुळे वीजपुरवठ्यात व्यत्यय तब्बल 85 ठिकाणी वाहिन्या तोडल्या

पुणे, दि. 27 एप्रिल 2021: शहरातील मुंढवा परिसरात अनेक सार्वजनिक व खासगी कामांसाठी सुरु असलेल्या खोदकामामध्ये गेल्या वर्षभरात उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या तब्बल 85 ठिकाणी तोडण्यात आल्या आहेत. यामुळे या परिसरातील सुमारे 33 हजार वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास होत असून महावितरणचे देखील आर्थिक नुकसान होत आहे.

बंडगार्डन विभाग अंतर्गत मुंढवा शाखेअंतर्गत 30 वीजवाहिन्यांद्वारे केशवनगर, मुंढवा गाव, मगरपट्टा रस्ता, लोणकरवस्ती, पिंगळेवस्ती, कोरेगाव पार्क रस्ता, गायरान वस्ती, साडेसतरा नळी आदी भागातील सुमारे 33 हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. मात्र गॅस पाईपलाईन, खासगी कंपन्यांचे केबल्स, रस्ता रुंदीकरण, पाण्याचे व ड्रेनेज पाईपलाईनसाठी विविध संस्थांकडून जेसीबी व इतर यंत्राद्वारे खोदकाम सुरु आहे. महावितरणला कोणत्याही प्रकारची पूर्वमाहिती न देता खोदकाम करण्यात येत आहे व गेल्या वर्षभरात उच्चदाबाच्या तब्बल 66 आणि लघुदाबाच्या 19 अशा 85 वीजवाहिन्या तोडल्या आहेत.

वीजवाहिन्या तोडण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे रात्री बेरात्री वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांना मोठी धावपळ करावी लागत आहे. सोबतच वीजग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. कधीकधी वीजपुरवठ्यामुळे पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ न शकल्यास मोठ्या कालावधीसाठी वीजपुरवठा खंडित राहत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे महावितरणला वीजविक्रीमध्ये नुकसान होत असून वाहिनीच्या दुरुस्तीचा खर्च देखील सहन करावा लागत आहे. यासोबतच मुंढवा परिसरातील ग्राहकांनाही खंडित वीजपुरवठ्याचा नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. प्रत्यक्ष खोदकाम करण्याच्या वेळेबाबत पूर्वमाहिती मिळाल्यास वीजवाहिन्यांना धोका होणार नाही याची काळजी महावितरणकडून घेण्यात येऊ शकते.