ऑटोरिक्षा मीटर पुनःप्रमाणीकरणास मुदतवाढ

पुणे, 31 ऑक्टोबर 2022: प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या कार्यक्षेत्रातील तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार १ सप्टेंबर २०२२ पासून भाडेवाढ लागू केलेली असून ऑटोरिक्षांचे मीटर पुनःप्रमाणीकरण करण्याकरीता ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑटोरिक्षा चालक, मालकांना ऑटोरिक्षांचे मीटर पुन:प्रमाणीकरण विहीत मुदतीत करुन घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ऑटोरिक्षा धारकांनी त्यांच्या ऑटोरिक्षा भाडेमीटरचे पुनःप्रमाणीकरण व मीटर तपासणीचे काम विहीत मुदतीत न केल्याने तसेच ऑटोरिक्षा संघटनांकडून ऑटोरिक्षा परवानाधारक, पालकांची गैरसोय टाळण्यासाठी मीटर पुनःप्रमाणीकरणाकरीता मुदतवाढ मिळण्याबाबत केलेल्या मागणीचा विचार करता मीटर पुनःप्रमाणीकरण करण्यास ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, प्राधिकरणाने घेतला आहे.

मुदतीत मीटर कॅलीब्रेशन करून न घेणाऱ्या ऑटोरिक्षाधारकांवर परवाना निलंबन किंवा तडजोड शुल्काची कारवाई करण्यात येणार आहे. मुदतीत मीटर कॅलीब्रेशन न केल्यास मुदत समाप्तीनंतर विलंबासाठी किमान ७ दिवस व त्यापेक्षा अधिक प्रत्येक एक दिवसासाठी १ दिवस आणि एकूण कमाल निलंबन कालावधी ४० दिवस राहणार आहे. निलंबनाऐवजी तडजोड शुल्काचा विकल्प घेतल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी ५० रूपये मात्र किमान ५०० रूपये आणि कमाल तडजोड शुल्क २ हजार रूपयांपर्यंत असेल, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी कळविले आहे.