September 12, 2025

भारतीय हवाई दलाचा बनावट अधिकारी पकडला; दक्षिण कमांड लष्करी गुप्तचर विभाग आणि खराडी पोलिसांची संयुक्त कारवाई

पुणे, १९ मे २०२५: दक्षिण कमांड लष्करी गुप्तचर विभाग आणि खराडी पोलिस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत एका २५ वर्षीय तरुणाला भारतीय हवाई दलाचा (IAF) बनावट अधिकारी असल्याप्रकरणी अटक करण्यात आली. आरोपी गौरव कुमार (रा. अलीगढ, उत्तर प्रदेश; सध्या राहणार थिटेवस्ती, खराडी) याला रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास वरद विनायक अपार्टमेंटजवळ, लेन क्रमांक २, थिटेवस्ती, खराडी येथे ताब्यात घेण्यात आले.

लष्करी गुप्तचर विभागाने दिलेल्या विशिष्ट माहितीनुसार खराडी पोलिसांनी सुरुवातीला आरोपीच्या हालचालींची खातरजमा केली आणि त्याच्यावर नजर ठेवली. माहिती निश्चित झाल्यानंतर संयुक्त पथकाने कारवाई करत त्याला अटक केली.

त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले भारतीय हवाई दलाशी संबंधित विविध साहित्य:

– २ हवाई दलाचे टी-शर्ट
– १ हवाई दलाची कॉम्बॅट पँट
– १ जोड कॉम्बॅट शूज
– २ हवाई दलाचे बॅचेस
– १ ट्रॅकसूट अ‍ॅपर

हेड कॉन्स्टेबल रामदास पळवे यांच्या तक्रारीवरून आरोपी गौरव कुमार याच्यावर खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर आरोपी खराडीतील सॅटी बर्ड हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करतो आणि केवळ बारावी उत्तीर्ण आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव कुमारने हवाई दलाचा गणवेश घालून, आपली ओळख बनावट अधिकाऱ्याप्रमाणे सांगून, मुलींना इम्प्रेस करून त्यांच्याशी संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला. “त्याने अनेक मुलींची फसवणूक केली आहे,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १६८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमान्वये कोणताही व्यक्ती जर सैनिक, नौदल किंवा हवाई दलाच्या गणवेशात किंवा त्यांच्या ओळखीच्या खुणा परिधान करून फसवणूक करतो, तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते.

पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, आणखी कोणी या फसवणुकीत सहभागी आहे का, याची चौकशी सुरू आहे.