व्रत समाजसेवेचे!

पुणे, २/९/२०२१:Strength does not come from winning. Your struggles develop your strength and decide not to surrender. That is strength. हे वाक्य ज्यांचं चपखल वर्णन करतं त्या म्हणजे प्रिया सरवणकर-गुरव! त्या जितक्या तन्मयतेने स्वयंपाकघरात रमतात तितक्याच मनापासून त्या सर्वसामान्यांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न सोडवतात. त्या आपल्या मुलांमध्ये-कुटुंबामध्ये रमतात त्यासोबतच स्वतःच्या आईच्या नावाने स्थापन केलेली सामाजिक संस्थाही सांभाळतात. त्या एक उत्तम गृहकृत्यदक्ष गृहिणी आहेतच त्यासोबत समाजातील गरजूंचे प्रश्न सोडवणाऱ्या, त्यांना मदत करणाऱ्या एक कणखर नायिका देखील आहेत. ‘राजनंदा चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेचे अध्यक्षपद भुषवणाऱ्या या व्यक्ती आहेत, श्रीमती.प्रिया सरवणकर-गुरव!
 
प्रिया सरवणकर-गुरव यांचं बालपण दादर- शिवाजी पार्क विभागातलं. त्यामुळे सहाजिकच मराठी बाणा, मराठी संस्कार, राजकारण, समाजकारण, संस्कृती, विविध अभिरुची इत्यादी गोष्टींचा प्रभाव त्यांच्या जडणघडणीत दिसून येतो. वडील, श्री.सदा सरवणकर हे राजकारणात सक्रिय असताना देखील प्रिया यांनी स्वतःची अशी एक वेगळी कलात्मक वाट चोखाळली आणि रचना संसदमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
 
आपल्या कार्याबद्दल व्यक्त होताना त्या म्हणतात, ‘‘राजनंदा चॅरिटेबल ट्रस्टची अध्यक्षा म्हणून काम करताना मला कायम अभिमान वाटतो. त्याचं मुख्य कारण म्हणजे लोकांना मदत करणे, त्यांच्या विविध समस्यांसाठी धावून जाणे, त्या समस्यांचा पाठपुरावा करून त्या सोडवणे या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळायची आवड मला बालपणापासून होती. समाजकारणाची आवड मला बालवयातच लागली. वडील राजकारणात सक्रिय असल्याने लहानपणापासूनच मला घरातून समाजिक कार्याचे बाळकडू मिळाले. मला आठवतंय, माझा जन्म झाला तेव्हा माझे वडील शिवसेनेचे गटप्रमुख होते. त्यामुळे त्यांना भेटायला आमच्या घरी सकाळी ८-९ वाजल्यापासूनच लोकांची गर्दी असायची. विविध ठिकाणाहून लोकं समस्या घेऊन मोठ्या अपेक्षेने माझ्या वडिलांना भेटायला यायची. कोणाला पाण्याची समस्या असायची, कोणाला विभागातील कामं करून हवी असायची तर कोणाला आणखी काही. मी माझ्या लहानपणापासून वडिलांना झोकून देऊन मनापासून काम करताना बघितलेलं आहे. त्यावेळी मी प्रत्यक्षदर्शी त्यांच्यासोबत काम करत नसले तरी त्यांचे काम बघताना नकळतपणे मला वडिलांकडून सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली.
 
मला लहानपणापासून वाटायचं लोकांसाठी काहीतरी करावं, त्यांच्या मदतीला धावून जावं पण घरातून मला ‘पहिलं शिक्षण आणि मग समाजकारण’ हे मनात पक्कं बिंबवलं गेलं. त्यामुळे शाळा-कॉलेजचे शिक्षण होऊन लग्न झाल्यावर मी काही काळ सामाजिक कार्यापासून लांब होते. मात्र मुळची आवड मला स्वस्थ बसू देईना. घरच्यांच्या पाठिंब्यामुळे मी पुन्हा समाजकार्यात सक्रिय झाले आणि हळूहळू यात रस घ्यायला सुरुवात केली. कारण ते माझं पॅशन होतं.
 
२०१९ साली आम्ही आईच्या नावाने ‘राजनंदा चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली. या ट्रस्टचा मुख्य उद्देश आपल्या परीने लोकांना जेवढी मदत करता येईल तेवढी करायची हा होता. आईच्या नावाने ट्रस्ट काढण्यामागची संकल्पना ही आहे की, माझी आई उत्तम गृहिणी होती तरीही ती तिला जमेल तशी लोकांना मदत करण्यासाठी कायम तयार असायची. आल्या-गेल्यांचे प्रेमाने करणं, त्यांच्या मदतीला धावून जाणं, पडद्यामागे राहून वडिलांना सामाजिक कार्यात मदत करणं ही तिची वैशिष्ट्ये. ती खूप संवेदनशील व्यक्ती होती. लोकांना आपल्या परीने जशी जमेल त्याप्रकारे मदत करण्याची तिची इच्छा असायची. म्हणूनच तिच्या नावाने ‘राजनंदा चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली.’’
 
ह्या चॅरिटेबल ट्रस्टचा मुख्य उद्देश गरजूंना मदत करणं हाच आहे. साधारण २ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या ट्रस्ट द्वारे प्रिया यांनी आत्तापर्यंत अनेक समाजोपयोगी कामं केली असून नुकत्याच कोकणमध्ये आलेल्या पूरासाठीही कपडे पाठवणे, ब्लँकेटस्‌ची पुरवठा करणे, औषधे पाठवणे अशी कामेही करण्यात आली आहेत. कोव्हिड कालावधीमध्ये राजनंदा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोरोना लढ्यासाठी मुख्यमंत्री निधीत एक लाख रुपये जमा करण्यात आले.
 
गेल्यावर्षी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या त्या दरम्यान मदतीचा हात म्हणून १० ते १५ हजार गरजूंना धान्य वाटप करणे, तृतीयपंथांना मदत करणे, रस्त्यावरील बंद पडलेल्या लघूउद्योगांना मदत करणे अशी अनेक कामं राजनंदा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेली आहेत. अशा प्रकारची मदत करताना ते कटाक्षाने प्रसिद्धीपासून लांब राहिले आहेत.
 
सध्या या ट्रस्टच्या मार्फत मदतीचे अनेक ओघ सुरू आहेत. भविष्यातील काही गोष्टींसाठी आराखडे बनवणं सुरु आहे. गरजूंना कमीत कमी दरात दोन वेळचं जेवण मिळावं यासाठी प्रयत्न करणं, गरजूंना वेळेत औषधे मिळवून देणं, विभागातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं, त्यांना आर्थिक मदत करणं अशा अनेक गोष्टी राजनंदा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहेत.
 
प्रिया सरवणकर–गुरव यांच्या कार्याला मनापासून सलाम आणि त्यांना पुढच्या वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा!
 
मुलाखत व शब्दांकन – स्मृती कुळकर्णी-आंबेरकर
प्रकाशचित्रे – प्रिया सरवणकर-गुरव यांच्या संग्रहातून साभार.