कंगना राणावत विरुद्ध पुण्यात तक्रार दाखल, बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची मागणी

पुणे, १४/११/२०२१: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणावत हिचे बेताल वक्तव्य म्हणजे बेकायदेशीर असामाजिक कृत्य असून तिच्या विरुद्ध बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायदा अंतर्गत (U.A.P.A.) १९६७ तसेच कलम १५३ ब व २४ भा.द.वि. नुसार गुन्हा नोंदवावा अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते व चित्रपट निर्माते निलेश नवलाख यांनी स्वारगेट पोलीस स्टेशन यथे दाखल केली आहे. अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या मदतीने दाखल केलेल्या या तक्रारीत कंगना रणावत हिचे वक्तव्य म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गैरवापराचे गंभीर प्रकरण आहे. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

स्वारगेट पोलीस स्टेशनचे जेष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पोकनर यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत कंगना रणावत हिच्या सोबतच पत्रकार नाविका कुमार व टाइम्स नाउ वृत्तवाहिनीवरही गुन्हा नोंदवावा अशी तक्रार करण्यात आली आहे.

दिनांक १० नोव्हेंबर २०२१ या दिवशी ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीवर आयोजीत करण्यात आलेल्या ‘टाइम्स नाउ समिट’ या कार्यक्रमात कंगना रानावत या बॉलीवूड अभिनेत्रीने भारतीय स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्य सैनिकांचा जाहीर अपमान केला. या आयोजित कार्यक्रमादरम्यान बोलताना अभिनेत्री कंगना राणावत हिने विधान केले की “अग्रेजोसे मिली वह आझादी नही थी, वह भिक थी और आझादी २०१४ मे मिली है”. तसेच हे वक्तव्य करताना कार्यक्रमाचे आयोजक टाइम्स नाऊ वाहिनीचे प्रतिनिधी आणि कार्यक्रमाचे सुत्रसंचालक यापैकी कुणीही तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.

उपरोक्त वाहिनी आणि कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका नाविका कुमार यांनी सुद्धा अजूनही कुठलाही निषेध नोंदवला नाही. त्यामुळे या कृत्यामध्ये कार्यक्रमाच्या सूत्र संचालिका नाविका कुमार आणि टाइम्स नाऊ वाहिनी हे सुद्धा तितकेच सहभागी आहेत. तसेच प्रथमदर्शनी हे दिसते कि कंगना राणावत हिने केलेले विधान हे स्वतः कंगना राणावत आणि सूत्र संचालिका नाविका कुमार यांच्या परस्पर सहमतीने ठरवुन केलेले दिसते. हे कृत्य अतिशय दुर्देवी आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र सैनिकांच्या बलिदानाची विटंबना आहे असे प्रतिपादन निलेश नवलखा यांनी दिलेल्या तक्रारीत केले आहे.

कंगना राणावत हिने केलेले विधान आणि त्याला चिथावणी देणाऱ्या पत्रकार नाविका कुमार हिचे विधान हे U.A.P.A. (असामाजिक कृत्ये प्रतिबंध कायदा) च्या कलम १५ नुसार अतिरेकी कृत्य आहे. तसेच भारताच्या संविधानाच्या कलम ५१(अ) अंतर्गत मूलभूत कर्तव्ये स्पष्ट करण्यात आली आहेत. संविधानाने कलम ५१(अ)(ब) अंतर्गत प्रत्येक नागरिकावर ‘स्वातंत्र्यासाठी आपल्या राष्ट्रीय लढ्याला प्रेरणा देणाऱ्या उदात्त आदर्शांचे पालन करणे आणि त्याचे अनुसरण करणे’ हे मुलभूत कर्तव्य म्हणून नमूद केले आहे. राज्यघटनेतील हा थेट संदर्भ महत्वाचा आहे कारण की स्वातंत्र्यासाठी करण्यात आलेल्या राष्ट्रीय संघर्षाचा आदर करणे हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. हे दुर्दैव आहे की कंगना हिने देशाच्या संविधान आणि कायद्याच्या तरतुदींवर आघात केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कंगना राणावत इतका दुर्दैवी गैरवापर कुणी केला नसेल असे मत अ‍ॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले.

घटनाक्रम वर्णन आणि गुन्हा करण्याच्या कार्यपद्धतीवरून असे दिसून येते की कंगना हिने नाविका कुमार आणि टाइम्स नाऊ वाहिनी यांनी एकत्रितपणे भारतीय दंड संहितेच्या कलम १५३(ब) च्या अंतर्गत गुन्हा ठरणारे कृत्य केले आहे. कंगना हिने केलेला गुन्हा हा भारताच्या स्वातंत्र्याचा, सार्वभौमत्व व अखंडतेचा अपमान करणारा अतिरेकी ‘बेकायदेशीर कृत्य व असामाजिक कृत्य’ आहे. तसेच भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेचे समर्थन करणाऱ्या भारतातील नागरिकांविरूद्ध आहे आणि म्हणूनच असे खोटे विधान करताना उपस्थित असलेल्या वाईट हेतूच्या घटकांचा विचार करता, अशा दखलपात्र आणि अजामीनपात्र कृत्याबद्दल कंगना राणावत,नाविका कुमार, टाइम्स नाव वाहिनीचे मालक व व्यवस्थापक ह्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा असे या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. हि तक्रार करत असताना अ‍ॅड. असीम सरोदे तसेच त्यांच्या सोबत अ‍ॅड. अजित देशपांडे, अ‍ॅड. अक्षय देसाई, अ‍ॅड. मदन कुऱ्हे, अ‍ॅड. तृणाल टोणपे, रुद्राणी वारद व अस्मा क्षीरसागर अशी कायदा टीम काम बघत आहे.

कंगना रानावत हिने लेखी माफी मागितली तर तिला क्षमा सुद्धा करण्याचा विचार होऊ शकतो पण अन्यथा उच्च न्यायालयात जाणार असल्याचे निलेश नवलाखा यांनी सांगितले. कंगना राणावत यांना दिलेला पद्म पुरस्कार परत घ्यावा यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना वेगळे पत्र पाठविण्यात आले असून पत्रकार नाविका कुमार यांच्या अनैतिक पत्रकातेविरोधात कारवाई करावी यासाठी न्यूज ब्रॉंडकास्टिंग स्टँडर्डस अथोरीटी (NATIONAL BROADCASTING STANDARDS AUTHORITY – NBSA) यांच्याकडे सुद्धा तक्रार करण्यात आल्याचे असीम सरोदे म्हणाले.