मनपा शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य

पुणे, ११/०८/२०२१: महापालिका शाळेतील इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवत्ताप्राप्त पहिल्या पाच विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. त्यामुळे हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. हुशार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी या वर्षी दहावी आणि बारावीतील पहिल्या पाच विद्यार्थ्यांना पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. या आशयाचा ठराव महिला बालकल्याण समितीने मान्यतेसाठी स्थायी समितीकडे पाठविला होता.