September 11, 2025

अन्न व औषध प्रशासनातर्फे बर्फ, शितपेय, आईस्क्रीम विक्रेत्याकडून ५० अन्न नमुने विश्लेषणासाठी ताब्यात

पुणे, १८ जून २०२५:- प्रत्येक नागरिकास सुरक्षित व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासन, पुणे कार्यालयामार्फत शितपेये, बर्फ, आईस्क्रीम, आंबा विक्रेता व उत्पादक यांची तपासणी करुन ५० अन्न नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेण्यात आलेले आहेत.

प्रशासनाने याकरीता एकूण ३० विक्रेत्यांची तपासणी करुन ५० अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले आहेत. या कालावधीमध्ये वर्षाचे ४ नमुने, आईस्क्रीम व कुल्फीचे २९ नमुने घेण्यात आलेले असून त्यांचे अहवाल प्रलंबित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अहवालाच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच १२ आंब्याचे नमुने घेण्यात आले होते सर्व नमुने प्रमाणित घोषित झाले आहेत. शितपेयाचे ५ नमुने घेण्यात आले असून १ नमुना प्रमाणित दर्जाचा व २ नमुने मिध्याछाप घोषित झाल्याने त्याअनुषंगाने पुढील दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

प्रत्येक नागरिकास सुरक्षित व निर्मळ अन्न उपलब्ध होण्यासाठी तसेच त्यात होणारी भेसळ रोखण्यासाठो अन्न व औषध प्रशासन दक्षता घेत आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भेसळयुक्त अन्नपदार्याबाबत संशय असल्यास किंवा त्याबाबत तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ संपर्क साधण्याचे पत्रकान्वये सह आयुक्त (पुणे विभाग), अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, पुणे सु. ग. अन्नपुरे यांनी कळविले आहे.