भारतीय अन्न महामंडळाची औरंगाबाद आणि अमरावती येथील विभागीय कार्यालये तातडीने कार्यान्वित होणार – रावसाहेब दानवे

नवी दिल्‍ली, 10 मे 2021: एफसीआय अर्थात भारतीय अन्न महामंडळाची महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि अमरावती येथील विभागीय कार्यालये तातडीने कार्यान्वित केली जात आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यासंबंधीची घोषणा करताना सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्रात एफसीआयची आणखी दोन विभागीय कार्यालये औरंगाबाद आणि अमरावती येथे आज तातडीने कार्यान्वित होत आहेत. ही कार्यालये मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ क्षेत्रांसाठी सेवा पुरविणार आहेत.”

दानवे पुढे म्हणाले, “यामुळे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील शेतकरी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे लाभार्थी, समाजसेवी संस्था, सरकारी संस्था आणि ग्राहक याना मोठा लाभ मिळेल. ही कार्यालये सुरु झाल्यामुळे, कार्यक्षमपणे व जलदगतीने कामे होण्यासाठी एफसीआयच्या संबंधित विभागीय कार्यालयांशी संपर्क साधणे सोयीस्कर होणार आहे.”

“राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत सर्वांना अन्नसुरक्षा मिळवून देण्यासाठी भारतीय अन्न महामंडळाची भूमिका सर्वोच्च महत्त्वाची आहे. त्याचवेळी, देशातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल खरेदी करण्याच्या दृष्टीने एफसीआय ही एक विश्वासार्ह संस्था म्हणूनही गणली जाते. देशातील व महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या कार्यालयांच्या माध्यमातून एफसीआय अतिशय कार्यक्षमपणे कारभार सांभाळत आहे. कोविडकाळात एफसीआयची भूमिका आत्यंतिक महत्त्वाची ठरली असून देशवासियांसाठी अविश्रांत काम करणाऱ्या या संस्थेचा मला अभिमान आहे”- अशी भावनाही दानवे यांनी व्यक्त केली.

गोव्यासह महाराष्ट्र राज्यात 06 विभागीय कार्यालयांमार्फत एफसीआयचे काम चालत असे. सद्यस्थितीत महाराष्ट्राच्या रचनेमध्ये- मुंबई आणि उपनगरीय क्षेत्राला सेवा देणारे बोरीवली येथील विभागीय कार्यालय, रायगडला सेवा पुरविणारे पनवेल विभागीय कार्यालय, दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकण पट्ट्याला सेवा पुरविणारे पुणे विभागीय कार्यालय, संपूर्ण विदर्भाला सेवा पुरविणारे नागपूर येथील विभागीय कार्यालय आणि नाशिक, खान्देश व मराठवाड्याच्या बहुतांश भागाला सेवा देणारे मनमाड विभागीय कार्यालय यांचा समावेश आहे.

वरील सारणीत दाखविल्याप्रमाणे नवीन विभागीय कार्यालये त्यांच्या अंतर्गतच्या महसुली जिल्ह्यांसाठी त्वरित कार्यान्वित होत आहेत. नवीन संरचनेनुसार सदर विभागीय कार्यालये – साठवण क्षमतांचे व्यवस्थापन, दैनंदिन कार्ये, सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी मालाची उचल, आणि गरजेनुसार प्रापण (खरेदी) प्रक्रिया- अशा सर्व कामांवर देखरेख करतील.

“केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, रेल्वे तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री.पीयूष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास- (सर्वांची साथ, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास)-‘ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविलेल्या दिशेने निरंतर काम करीत राहील. ” असेही दानवे म्हणाले.

उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी क्षेत्रीय कार्यालये, प्रादेशिक कार्यालये, विभागीय कार्यालये आणि आगाराच्या मार्फत एफसीआय कार्यरत आहे. देशभरात एफसीआयची 05 क्षेत्रीय कार्यालये (पूर्व,पश्चिम,दक्षिण,उत्तर आणि ईशान्य) आणि 26 प्रादेशिक कार्यालये कार्यरत आहेत. महसुली जिल्ह्यांच्या आधारे प्रादेशिक कार्यालयान्तर्गत विभागीय कार्यालये काम करतात.