जपानी सरकारसाठी महाराष्ट्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचे ‘पॉवरहाऊस’- तोशिहिरो कानेको

पुणे, दि. १८ नोव्हेंबर : भारत व जपान सरकार अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर एकत्रितपणे काम करीत असून यांमध्ये आर्थिक प्रगती सोबत पर्यावरणास अनुकूल विकास आणि कार्यक्षम पायाभूत सुविधाउभारणे यांवर भर देण्यात आला आहे. या गोष्टी होत असताना जपान सरकारसाठी महाराष्ट्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचे ‘पॉवरहाऊस’ असून, पुणे हा त्याचाच एक भाग आहे, असे जपान सरकार मानत असल्याचे प्रतिपादन कॉन्स्यूलेट जनरल ऑफ जपान इन मुंबईचे मुख्य काउंसिल तोशिहिरो कानेको यांनी केले. पुण्यातील इंडो जपान बिझनेस काउंसिल अर्थात आयजेबीसी आणि जपान सरकारचे कॉन्स्यूलेट जनरल ऑफ जपान इन मुंबई यांच्या वतीने आयोजित चौथ्या ‘कोन्निचिवा पुणे २०२२’ या तीन दिवसीय महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

वाकड येथील सयाजी हॉटेल येथे ‘कोन्निचिवा पुणे २०२२’ या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कॉन्स्यूलेट जनरल ऑफ जपान इन मुंबईचे मुख्य काउंसिल तोशिहिरो कानेको उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस, जायकाच्या भारतातील प्रतिनिधी मारिया कातो, फुजित्सूचे प्रतिनिधी सचिन कळसे, आयजेबीसीचे अध्यक्ष सिद्धार्थ देशमुख, उपाध्यक्ष अभिषेक चौधरी, माजी अध्यक्ष अनिल हाटकर, ओंकार बारी, प्रशांत खिंवसरा आणि शेफाली तिवारी आदी मान्यवर उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते. भारत आणि जपान या दोन्ही देशातील व्यापारी संबंध आणखी दृढ व्हावेत, दोन्ही संस्कृतींमध्ये आदानप्रदान व्हावे आणि पर्यायाने व्यापार, व्यवसाय, शिक्षण यांच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

भारत आणि जपान हे गौतम बौद्ध आणि बौद्ध धर्म यांद्वारे जोडले गेले असून सदर वर्ष हे दोन्ही देशाच्या राजनैतिक संबंधांचे ७० वे वर्ष असल्याचे सांगत कानेको म्हणाले, “राज्यात येऊ घातलेली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबईमधील कुलाबा- सीप्झ मेट्रो ३, मुंबई-ट्रान्स हार्बर लिंक, दिल्ली-मुंबई डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आणि दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर हे जपान व भारत सरकार एकत्रितपणे करीत असलेले काही प्रकल्प असून यामुळे पर्यावरणपूरक कार्यक्षम आर्थिक विकासावर भर देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा आणखी दर्जेदार करण्यावर जपान सरकार खूप मेहनत घेत असून नजीकच्या भविष्यात आणखी काही प्रकल्प या द्विपक्षीय संबंधांची विकास गाथा ठरतील.” असे कानेको म्हणाले. तसेच भारतीय उपखंडात स्थैर्य राखण्यासाठी भारत- जपान कटिबद्ध असल्याचे कानेको यांनी आवर्जून नमूद केले.

भारत आणि जपान हे दोन्ही देश पारंपारिक मित्र असून येत्या ३० वर्षांमध्ये ही मैत्री आणखी दृढ होईल, असा विश्वास डॉ. चिटणीस यांनी व्यक्त केला. “देशपातळीसोबरच राज्य स्तरावर देखील भारत जपान संबंध आणखी दृढ व्हावेत यादृष्टीने आपण प्रयत्न करायला हवे. हे करीत असताना आपल्या सर्वांसमोर सांस्कृतिक आणि भाषेच्या मर्यादा असतील मात्र त्या असल्या तरी पर्याय शोधत आपल्याला काम करावे लागेल.” असे डॉ. रवीकुमार चिटणीस म्हणाले.

भारत जपान संबंधांचा भविष्याच्या दृष्टीने विचार केल्यास नवी पिढी ही दोन्ही देशाचे भविष्य असणार आहे, हे लक्षात घेत आता आपल्याला काम करावे लागेल. नजीकच्या भविष्यात अवकाश, उर्जा, पर्यावरण, सुरक्षा आदी महत्त्वाच्या बाबींवर आपण एकत्रित काम करू शकू, असा विश्वास सिद्धार्थ देशमुख यांनी व्यक्त केला.

जपानमधील भारत सरकारचे प्रतिनिधी असलेले शिशिर कोठारी यांनी ऑनलाईन पद्धतीने सहभागी होत, महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. भारत जपान मैत्री पलीकडील राजनैतिक संबंध, व्यावसायिकदृष्ट्या पुरवठा साखळीचे महत्त्व, जपानमधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची उभारी, भविष्यवेधी अशा उर्जा क्षेत्रातील संधी, स्टार्ट अप्स आणि गुंतवणूक यांसारख्या अनेक विषयांवर या परिषदेत चर्चा झाली. महोत्सवाच्या दुस-या व तिस-या दिवशी म्हणजेच शनिवार व रविवारी विमान नगर येथील फिनिक्स मॉल या ठिकाणी सांस्कृतिक महोत्सव पार पडेल. यामध्ये जपानी संस्कृतीची झलक या ठिकाणी होणा-या कार्यक्रमांमध्ये पहायला मिळेल. सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच खाद्यमहोत्सव, आर्ट कॉर्नर हे या दिवशीचे मुख्य आकर्षण असणार आहे.

इंडो जपान बिझनेस काउंसिल अर्थात आयजेबीसी बद्दल – भारत जपान संबंध आणखी दृढ व्हावेत, दोन्ही देशातील नागरिकांना व्यापार, शिक्षणाच्या संधींसोबतच व संस्कृतीची माहिती व्हावी, या उद्देशाने २०११ साली पुण्यात संस्थेची स्थापना झाली. ना नफा ना तोटा या तत्त्वावर संस्थेचे काम सुरु असून दोन देशांमध्ये एक पूल बांधण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने गेली अनेक वर्षे करण्यात येत आहे. ‘कोन्निचिवा पुणे’ म्हणजेच नमस्ते पुणे अशा आशयाचा महोत्सव गेली चार वर्षे संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे. भारतीय नागरिकांसोबतच जपानी नागरिकांचे देखील विशेष सहकार्य संस्थेला मिळते हे विशेष.