पुणे, २७ जून २०२५: राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आगामी चार वर्षांत वन विभागाला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. वन विकास महामंडळाच्या (एफसीडीएम) माध्यमातून पब्लिक इश्यू काढण्याचा विचार सुरू असून, यामुळे वन विभाग स्वतःच उत्पन्न निर्माण करून विकासकामांसाठी निधी उभारू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘लोकसहभागातून वन संवर्धन आणि पर्यावरण पूरक उपजीविका’ या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी नाईक बोलत होते. ही कार्यशाळा वन विभाग, डीईएस पुणे विद्यापीठ आणि वनवासी कल्याण आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाला देवगिरी कल्याण आश्रमाचे चेत्राम पवार, डीईएस पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, विश्वस्त अनंत जोशी, प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन कुलकर्णी आणि वनवासी कल्याण आश्रमाचे गिरीश कुबेर उपस्थित होते.
गणेश नाईक यांनी यावेळी सांगितले की, यापूर्वी जागतिक बँकेच्या निधीतून साधनसामग्री खरेदी करण्यात आली होती, पण योजनाबद्ध उपयोगाचा अभाव होता. सध्या त्या यंत्रणा कालबाह्य झाल्यामुळे नव्या उपक्रमांची गरज आहे. मोठ्या कंपन्यांच्या मदतीने फळप्रक्रिया उद्योग, मध संकलन केंद्र आणि स्वतःचा ब्रँड सुरू करण्याचे नियोजन असून, यासाठी वित्त आणि विधी विभागांचीही मान्यता घेतली जाईल. पेपर पल्प उत्पादनावर भर देण्यात येणार आहे, कारण सध्या देशात फक्त ५० टक्के गरज भागवली जाते आणि उर्वरित आयात करावी लागते.
नाईक यांनी पुढे सांगितले की, एफसीडीएमच्या माध्यमातून निधी उभारून महाबळेश्वर व माथेरान येथील वनक्षेत्रात मध संकलन प्रकल्प आणि ब्रँड सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय, चंद्रपूर येथे ७० कोटींच्या निधीतून आठ महिन्यांत फर्निचर कारखाना सुरू केला जाणार आहे. खासगी भागीदारीतून तयार केलेले फर्निचर शासकीय विभागांना, शाळांना पुरवले जाणार असून त्यासाठी स्वतंत्र निविदांची गरज भासणार नाही.
गिरीश कुबेर यांनी जनजातींच्या पारंपरिक ज्ञानाचा अभ्यास करण्याची गरज व्यक्त केली. वन हक्क कायद्यानुसार स्थानिक प्रशासन रचना सक्षम होणे आवश्यक असून, ग्रामपंचायत स्तरावर प्रशिक्षण देण्याचेही महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, कृषी विज्ञान केंद्राच्या धर्तीवर राज्यात वन विकास केंद्र स्थापन करण्याचे नियोजन सुरू आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रवींद्र आचार्य यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. सागर विद्वांस यांनी केले आणि आभार प्रा. तुषार देशमुख यांनी मानले.
More Stories
Pune: पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सव’ रंगणार २ ते १६ नोव्हेंबरदरम्यान
Pune: जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीला जैन समाजाचा विरोध
Pune: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकचा शुभारंभ