पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढल्या फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे, ता. २६/०२/२०२२: राज्यातील राजकीय प्रतिनिधी तसेच व्हीआयपी लोकांचे विनापरवानगी फोन टॅप केल्याप्रकरणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त व सध्याच्या सीआरपीएफच्या महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून महा विकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप यांच्या वादातील फटका शुक्ला यांना बसणार आहे.

महाराष्ट्र विधीमंडळाच्या २०२१ च्या पावसाळी अधिवेशना मध्ये उपस्थित झालेल्या प्रश्नानुसार शासनाने सन २०१५ ते २०१९ या पाच वर्षीय कालावधीतील संपुर्ण फोन टॅपिंग प्रकरणाची पडताळणी करण्याकरीता तात्कालिक पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. सदर उच्चस्तीय समितीने सन २०१५ ते २०१९ या पाच वर्षाचे कालावधीतील फोन टॅपिंग प्रकरणांची पडताळणी करुन उपरोक्त कालावधीमध्ये अनिष्ट राजकिय हेतुने लोकप्रतिनिधींचे फोन गैरपध्दतीने टॅप करण्यात आले आहेत किंवा कसे? याचा तपास करणे व तसे आढळल्यास अशा प्रकरणी संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यासंदर्भात उच्चस्तरीय समितीने दिलेला अहवाल शासनाने स्विकृत केला.

या उच्चस्तरीय समितीने रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या कार्यकाळात बेकायदेशीर अभिवेक्षण (फोन टॅपिंग) केले असे नमुद केल्याचे स्पष्ट झाले आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर भारतीय तार अधिनियम कलम २६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.