एका दिवसात चाळीस हजार प्रमाणपत्र होणार प्रिंट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रिंटिंग मशीनचे उद्घाटन 

पुणे, दि.२२/०८/२०२२- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सोमवारी गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र छापण्याच्या मशीनचे उद्घाटन करण्यात आले. या मशीनमुळे एका दिवसात चाळीस हजार प्रिंट घेणे शक्य होणार आहे.

 

परीक्षा विभागातील प्रिंटिंग युनिट मध्ये या मशीनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.महेश काकडे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, डॉ.संजय चाकणे, संतोष ढोरे, डॉ.महेश आबाळे, डॉ.सुधाकर जाधवर, परीक्षा विभागातील विशेष कार्याधिकारी दत्तात्रय कुटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

याबाबत माहिती देताना डॉ. संजीव सोनवणे म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पुणे, अहमदनगर आणि नाशिक येथील जवळपास ६५० महाविद्यालयांशी संलग्न असून साधारण आठ लाख विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून गुणपत्रिका त्याबरोबरच पदवी प्रमाणपत्र दिले जाते. यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने हे मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

डॉ.महेश काकडे म्हणाले, आधीच्या मशीनमध्ये एकावेळी केवळ पाचशे पेपर लोड केले जात होते मात्र यामध्ये एकावेळी आठ हजार पेपर लोड करता येतात. तसेच यामध्ये प्रिंटिंग ची गुणवत्तादेखील वाढणार आहे. तसेच ‘इमेज प्रोसेसिंग’ जलद होणार असल्याने वेळ वाचणार आहे.

 

 

विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची छपाई अधिक जलद होण्याच्या दृष्टिकोनातून या प्रिंटिंग मशीनची खरेदी करण्यात आली आहे. परीक्षा विभाग अधिकाधिक सक्षम करण्याचा आमचा मानस आहे. – डॉ.कारभारी काळे, कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ