शेअर ट्रेडर तरूणाचे खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या चौघांना चतुःशृंगी पोलिसांकडून अटक

पुणे, १४ मे २०२१: खंडणीसाठी शेअर ट्रेडर तरूणाचे मोटारीतून अपहरण करून हातपाय बांधून मोबाईल, अंगठी, घड्याळ, एटीएम काढून घेणाऱ्या चौघांना चतुःशृंगी पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मोहित हेमंत वेदपाठक (वय ३२, रा. खराडी, मूळ- लोहा नांदेड), अक्षय दिलीप गिरीगोसावी (वय २७, रा. येरवडा), मारूती नंदू पवार (वय ३४, माले, मुळशी) आणि नरहरी मोतीराम भावेकर ( वय ३१, वळणे सोनारवाडी, मूळशी) यांना अटक केले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूण शेअर ट्रेडर असून त्याची आरोपी मोहित वेदपाठक सोबत ओळख होती. फिर्यादीला मोठ्या प्रमाणात रक्कम मिळणार असल्याची माहिती मोहितला होती. त्यामुळे त्याने तीन साथीदारांच्या मदतीने १० मे रोजी बाणेरमधून फिर्यादी तरूणाचे अपहरण केले. त्यानंतर आरोपींनी तरूणाचे हात-पाय बांधून  मुळशीतील एका शेतामध्ये नेले. त्याठिकाणी मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल, घड्याळ, अंगठी काढून घेत १५ लाखांची खंडणी मागितली. त्यानंतर तरूणाने त्यांना रक्कम देण्याची तयारी दर्शविल्यामुळे आरोपींना त्याला १२ मे ला बाणेरमध्ये सोडून दिले. त्यानंतर तरूणाने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.
गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे आणि पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी दोन टीम तयार केल्या. सहायक पोलीस निरीक्षका संतोष कोळी आणि पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांच्या टीमने आरोपींचा शोध सुरू केला. गुन्ह्यातील मुख्य आरोपी मुळशीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार चतुःशृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुख्य आरोपीसह चौघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.  ही कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, सुधीर माने, प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर मुळे, श्रीकांत वाघवले, संतोष जाधव, भाउराव वारे, प्रमोद शिंदे यांच्या पथकाने केली.