पीएमपीएमएल कडून बस डे निमित्त प्रवाशांसाठी आयोजित केलेल्या लकी ड्रॉ मधील विजेत्यांना बक्षीस स्वरुपात मोफत बस पास

१७/०४/२०२२: पुणे महानगर परिवहन महामंडळाचा १५ व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहन महामंडळाकडून सोमवार, दि. १८ एप्रिल रोजी “बस डे” या महत्वपूर्ण उपक्रमासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. “बस डे” दिवशी पीएमपीएमएल च्या विविध बससेवांचा लाभ घेणाऱ्या सर्व प्रवाशांकरिता ‘लकी ड्रॉ’ चे  आयोजन करण्यात आले असून त्या ‘लकी ड्रॉ’ मधील ३ विजेत्या प्रवाशांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे दिली जाणार आहेत.

 

या मध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला १ वर्षाकरिता सर्व मार्गावर प्रवास करण्यासाठी मोफत पास, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला ६ महिन्याकरीता सर्व मार्गावर प्रवास करण्यासाठी मोफत पास, तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला ३ महिन्याकरीता सर्व मार्गावर प्रवास करण्याकरिता मोफत पास दिला जाणार असून १४ आगारातून उत्तेजनार्थ १४ विजेत्यांना ३ महिन्याकरीता सर्व मार्गावर प्रवास करण्याकरिता मोफत पास दिला जाणार आहे.

 

दि. १८ एप्रिल २०२२ रोजी “बस डे” दिवशी पीएमपीएमएल मार्फत देण्यात येणाऱ्या सेवा व सुविधांची माहिती होणेचे दृष्टीने बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशास पीएमपीएमएल कडून माहिती पत्रक देण्यात येणार असून त्यामध्ये लकी कुपन असणार आहे. प्रवाशांनी कुपनमध्ये स्वतःचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर व पीएमपीएमएल सेवेबाबतचा अभिप्राय नमूद करावयाचा आहे. सदरचे कुपन प्रत्येक बस व बसस्थानकामध्ये ठेवलेल्या बॉक्स मध्ये जमा करावयाचे आहे. जमा होणाऱ्या कुपनांमधून लकी ड्रॉ काढून विजेत्या प्रवाशांना वार्षिक, सहामाही व त्रैमासिक मोफत बस पास बक्षीस स्वरुपात दिले जाणार आहेत.

 

‘लकी ड्रॉ’ ची सोडत दि. १९ एप्रिल २०२२ रोजी पीएमपीएमएलच्या वर्धापन दिनानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, शिवाजीनगर येथे होणार असून ‘लकी ड्रॉ’ मधील विजेत्या प्रवाशांना त्यांच्या मोबाईल नंबरवर  संपर्क साधून माहिती दिली जाईल.  त्यानंतर स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन करून पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा व सहव्यवस्थापकीय संचालक मा. डॉ. चेतना केरूरे यांच्या हस्ते पास वितरीत केले जाणार आहेत.

 

दर्जेदार प्रवाशी सेवा देण्यास पीएमपीएमएल सक्षम, तत्पर व कटिबद्ध आहे तरी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी पीएमपीएमएलच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करावा व ‘लकी ड्रॉ’ मध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन पीएमपीएमएल या निमित्ताने करत आहे.