वैद्यकीय उपचारांसाठी मनपा सेवक आणि कुटुंबियांना पूर्ण सवलत

पुणे, ११/०८/२०२१: अंशदायी वैद्यकीय सहाय्य उपचार योजनेअंतर्गत महापालिका सेवक आणि त्यांच्या कुटुंबियांना उपचारासाठी १०० टक्के सवलत देण्यात यावी असा निर्णय स्थायी समितीने घेतल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘कोरोनाच्या काळात महापालिकेचे सेवक फ्रंटलाइन वर्कर म्हणून कार्यरत आहेत. अनेक सेवकांना कोरोनाची लागण झाली. काही जणांना प्राण गमवावे लागले. कोरोनामुळ सेवकांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली आहे. अंशदायी वैद्यकीय सहाय्य उपचार योजनेअंतर्गत उपचारांसाठी ९० टक्के अनुदान देण्यात येत होते. ते वाढवून १०० टक्के करण्यात आले आहे. महिला आणि बालकल्याण समितीने याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला होता.’