पुणे, २६ जानेवारी २०२५ : पुणे शहरामध्ये गुलियन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण आढळत असताना पुण्यातील धायरी परिसरातील एका सनदी लेखापाल (सीए) असलेल्या तरुणाचा सोलापूर मध्ये खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला. दरम्यान, या तरुणाला पुण्यामध्ये असतानाच जुलाबाचा त्रास सुरू झालेला होता, ते कुटुंबसहित सोलापूरला गेल्यानंतर तेथे त्रास आणखी वाढल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते.
त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, ते पुण्यात खासगी कंपनीमध्ये ते नोकरी करत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. या तरुणास ११ जानेवारी रोजी पुण्यामध्ये जुलाबाचा त्रास सुरू झालेला होता. काही कार्यक्रमानिमित्त त्यांचे कुटुंबीय सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्या गावी गेले होते. मात्र तेथे गेल्यानंतर त्यांचा अशक्तपणा आणखीन वाढला. त्यामुळे त्यांना सोलापूर मधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले होते.
त्याची लक्षणे पाहून डॉक्टरांनी त्यांना ‘जीबीएस’ चे निदान केले. दरम्यान, उपचार सुरू असताना त्यांची तब्येत स्थिर होती. पण त्यांना हात पाय हलवता येत नव्हते. गेले पाच दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने शनिवारी त्यांना अतिदक्षता विभागातून जनरल वॉर्ड मध्ये हलविण्यात आले. मात्र काही वेळातच त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला आणि त्याचाच त्यांचा मृत्यू झाला, असे नातेवाईकांनी सांगितले.
रुग्णालयातील त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर म्हणाले की या रुग्णास ‘जीबीएस’ झालेला होता. त्यावरील उपचार पूर्ण केले. बरे वाटत असल्याने त्यांना अतिदक्षता कक्षातुन बाहेर शिफ्ट केले होते. पण, अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांचा सायंकाळी मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी त्यांचे शवविच्छेदन केले जाणार आहे.
म्हणून पुण्यात नोंद नाही
पुण्यामध्ये सध्या ७३ जीबीएस चे रुग्ण आहेत पण. या रुग्णाची नोंद पुण्यात झालेली नाही. कारण त्याला ‘जीबीएस’ची लक्षणे पुण्यात दिसत असली तरी त्यांनी उपचार हे सोलापूर मध्ये घेतलेले आहेत. त्यामुळे याची नोंद पुण्यात नाही.
या संदर्भात पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “पुणे महापालिका ‘जीबीएस’ चा प्रतिबंध करण्यासाठी गांभीर्याने काम करत आहे. यासंदर्भात रविवारी या संदर्भात आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केलेली आहे.”

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर